नागपूर : सेंटर पॉईट हॉटेलसमोर संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने पाच वाहनांना धडक दिली. तेथून तिघेही कारने पळून जात असताना मानकापूर चौकात त्यांनी आणखी एका पोलो कारला धडक दिली. त्यामुळे चिडलेल्या कारमालकाने त्यांचा पाठलाग करुन मानकापूर उड्डाणपूलावर थांबवले. संकेत बावनकुळेसह तिघांनाही मारहाण करण्यात आली. तेथून तिघांनीही पळ काढल्याची माहिती समोर आली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून हिवसे आणि रोनित चिंतमवार हे रविवारी मध्यरात्री लाहोरी बारमधून दारु पिऊन ऑडी कारने घराकडे निघाले होते.
सेंट्रल बाजार रोडवरुन ते भरधाव जात होते. सेटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने जीतू सोनकांबळे याच्या कारला धडक दिली आणि पळून गेले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारला धडक दिल्यानंतर त्यांनी थेट कोराडीकडे पळ काढला. मात्र, मानकापूर चौकातून टी पॉईंटवरुन जात असताना त्यांच्या ऑडी कारने एका पोलो कारला धडक दिली आणि पळून जात होते. पोलो कारचे थोडेफार नुकसान झाले. त्या कारमालकाने ऑडीचा पाठलाग केला. मानकापूर उड्डाणपुलाजवळ ऑडीला थांबवले. तिघांनाही कारबाहेर काढून मारहाण केली. यात संकेत बावनकुळेचा समावेश होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा…नागपूर ‘हिट अँड रन’ : रात्री १२.३० ते १ या वेळेत संकेत बावनकुळेचे लोकेशन काय होते? काँग्रेसचा सवाल
गाडीच्या नंबर प्लेटचे गौडबंगाल काय?
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन ऑडी कार ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कार जप्त करण्यापूर्वी ऑडी कारची नंबर प्लेट काढण्यात आलेली होती. त्या कारची नंबर प्लेट कुणी बदलवली? असा प्रश्न समोर आला आहे. या प्रकारावरून सीताबर्डी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संकेत चालवत होता कार?
कारने पाच वाहनांना घडक दिल्यावर चालकाने कारसह पळ काढला. कारमध्ये संकेत बावनकुळे आणि अन्य दोन तरुण बसले होते. मात्र, गुन्हा दाखल करताना पोलिसांनी केवळ अर्जूनवरच गुन्हा दाखल केला. संकेत आणि रोनितवर गुन्हा दाखल केला नाही. तसेच रोनित आणि अर्जूनला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. मात्र, संकेतला सायंकाळपर्यंत ताब्यातही घेतले नव्हते. रात्री ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली नाही. ती भरधाव कार संकेतच चालवित होता, अशी चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी संकेत फक्त चालकाच्या बाजूच्या सिटवर बसला होता, असा दावा केला आहे.
हे ही वाचा…गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती,अनेक मार्ग बंद, रुग्णालयात पाणी,रुग्णांचे हाल..
पोलीस दबावात
आ. चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळे यांचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी पोलीस नकार देत होते. तपासाचा भाग आहे, असे सांगून वेळ मारून नेत होते. ठाणेदार चंद्रशेखर चकाटे तर कारचा क्रमांकही सांगण्यास तयार नव्हते. कारमध्ये संकेतच नव्हताच, अशी भूमिका सीताबर्डी पोलीस घेत होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजवरुन संकेत कारमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी संकेतला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, या प्रकरणात पोलिसांना अद्यापही राजकीय दबाव असल्याचे बोलले जाते.