अमरावती: छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि इतिहास विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरत आला आहे. त्यांनी गनिमी कावा आणि अतुलनीय युद्ध कौशल्याने स्वराज्य स्थापन केले. प्रतापगडची लढाई, अफझलखान वध आणि पन्हाळगडावरून सुटका यांसारख्या प्रसंगातून त्यांचे शौर्य, नियोजन आणि नेतृत्व कौशल्य समजते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते, ज्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन रयतेच्या रक्षणासाठी काम केले. जे आजच्या पिढीला शिकण्यासारखे आहे.
विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘एम.ए. (छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन)’ या विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिवरायांचे विचार आणि त्यांचे प्रगत व्यवस्थापन कौशल्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
या अभ्यासक्रमात केवळ इतिहासच नव्हे, तर शिवरायांच्या काळातील प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्थापनाचा आधुनिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जाणार आहे. अभ्यासक्रमात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सखोल अभ्यास, शिवकालीन व्यवस्थापन कौशल्यांचा आधुनिक व्यवस्थापनात वापर, नेतृत्व, संघटन कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा आणि करिअरसाठी उपयुक्त पाठ्यक्रम, इतिहास, विचारधारा आणि व्यवस्थापन यांचा त्रिवेणी संगम, आदी बाबींवर भर दिला जाईल.
पात्रता आणि प्रवेश
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असून इच्छुक उमेदवारांना आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठात संपर्क करावयाचा आहे. तरी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या अभ्याक्रमाकरीता प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. काही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधता येईल.
विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळणार
राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक विचारसरणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन, भारतीय राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव, १७ व्या शतकातील दख्खनच्या भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय वातावरणाबद्दल विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे.
‘इतिहास समजून घ्या.. नेतृत्व घडवा!’ या ब्रीद वाक्यासह सुरु झालेला हा अभ्यासक्रम तरुणांसाठी रोजगाराच्या आणि वैचारिक प्रगल्भतेच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारा ठरेल, असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
