बुलढाणा : हेचि व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||
पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||…
या सार्थक ग्रंथ वाणी प्रमाणे संत गजाननाच्या शेगावातून संत गजानन महाराजांच्या पालखीने श्रींच्या मंदिर परिसरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. आज रविवारी, २१ जूनला सकाळी मार्गस्थ झालेल्या या आषाढी वारीत ७०० पेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले. या पालखीला निरोप देण्यासाठी आणि पालखी प्रस्थानाचे विहंगम दृश्य डोळ्यात अन मनात साठविण्यासाठी हजारो भाविकांची संतनगरी शेगावात मंदियाळी जमली होती.
पालखीचे ५७ वे वर्ष
श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५७ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखी समवेत ७०० पेक्षा जास्त वर वारकऱ्यांसह, रथ, मैणा, आश्वासह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी सहभागी झाले आहे. त्यांनी श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल , जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, मंत्राचा नाम जप करीत वारकरी संतनगरीतून विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान केले.
तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमी चे अंतर कापून श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे. श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम २३ जुलै ते २८ जुलै पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान च्या शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे.
असा आहे प्रवास
शेगावातून निघाल्यानंतर २१ जुन रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये श्रींची पालखी पोचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. २२ जुनं रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम राहील. सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे २३ व २४ जुन असा दोन दिवस पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर सुनिश्चित मार्गाने श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे.
२९ जुलैला परत फिरणार
श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे २९ जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी खामगाव येथे परतीच्या प्रवासातील शेवटचा मुक्कामी राहिल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.
