अकोला : वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण प्राप्त झाले. पतीचा मृतदेह विजेच्या टॉवरला लटकलेल्या अवस्थेत, तर पत्नी व मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी शेतीच्या हिस्स्याच्या वादातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शिरपूर जैन पोलिसांनी सख्ख्या भावासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. मृतकाचा भाऊ महादेव उर्फ महादा तुकाराम बकाल (४४) याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस ठाण्यांतर्गत तिवळी गावात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप लहान मुलांचे मृतदेह शेतात १३ जूनला आढळून आले. तिवळी येथील बकाल यांच्या स्वतःच्या शेतात हे मृतदेह आढळून आले. संतोष तुकाराम बकाल (वय ३८) यांचा मृतदेह शेतातील विजेच्या टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. वर्षा संतोष बकाल (वय ३४), जान्हवी (मुलगी, वय अंदाजे ७) व सोहम (मुलगा, वय अंदाजे ६) यांचे मृतदेह विहिरीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. शिरपूर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतकांवर गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा चार जणांवर गुन्हा दाखल

मृतकाचे मेव्हणे सुधाकर सुभाष इंगोले (वय ३३, रा. शिरसाळा, ता. मालेगाव) यांनी १४ जून रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून शिरपूर जैन पोलिसांनी महादेव उर्फ महादा तुकाराम बकाल, उर्मिला महादेव बकाल, पंकज महादेव बकाल आणि भगवान उर्फ सावन महादेव बकाल यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतकाचा भाऊ महादेव तुकाराम बकाल (४४) याला अटक केली आहे.

… तर चौघांचा जीव वाचला असता

घटनेच्या दिवशी वर्षा बकाल यांचा भाऊ बहीण, जावई यांना अधिकमासाच्या कार्यक्रमाला घेऊन जाण्यासाठी तिवळी येथे आला होता. ‘शेतातील हळदीच्या लागवडीचे काम आणि ठिबक सिंचनाची व्यवस्था करायची आहे, आम्हीच येतो’, असे वर्षा यांनी भावाला सांगून जाण्याचे टाळले. कुटुंब त्या दिवशी गेले असते, तर ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत होते.