लोकसत्ता टीम अकोला : सर्पसेवा, निसर्गसृष्टी व जनजागृतीच्या ध्येयाने झपाटलेले अकोल्यातील ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी कर्करोगामुळे आलेल्या ७९ टक्के दिव्यांगत्वावर मात करून आपल्या कार्याला व्यापक स्वरूप दिले. गेल्या २६ वर्षांपासून त्यांनी तब्बल २० हजारांवर सापांना जीवदान दिले. मानद वन्यजीव रक्षक काळणे यांच्यावर जीवघेण्या कर्करोगाने झडप घातली होती. कर्करोगाशी कडवी झुंज देतानाही त्यांनी सर्पसेवा अविरत सुरू ठेवली. कर्करोगावर मात केल्यावर आता ते निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाचे कार्य झोकून देत करीत आहेत. प्राणी, पक्षी, जीव-जंतू निसर्गसृष्टीचा भाग आहे. त्यातीलच एक साप हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणवल्या जात असला तरी सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा जीव जातो. विषारी सापांपासून जीवाला धोका असल्याने त्याला मारून टाकण्याकडेच बहुतांश लोकांचा कल असतो. साप हा देखील निसर्गचक्राचा एक भाग आहे. याची जाणीव करून देत सापांच्या संरक्षणाचे कार्य सर्पमित्र बाळ काळणे गत २६ वर्षांपासून करीत आहेत. स्वयंस्फूर्तीने त्यांनी साप पकडण्याची कला अवगत केली. निष्णात सर्पमित्र होत त्यांनी आतापर्यंत अत्यंत विषारी नाग, घोणस, मण्यारसह विविध प्रकारच्या सुमारे २० हजारावर सापांना जीवदान दिले. सापांना पकडून जंगलात सोडण्यासोबत त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्यावरही भर दिला. विद्याार्थी, शेतकरी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक यांना विषारी-बिनविषारी सापांची विविध कार्यक्रमांमधून माहिती दिली. अनेक वेळा स्वत:चा जीव धोक्यात घालत सापांसोबतच अनेक वन्यप्राण्यांचाही त्यांनी जीव वाचवला. या कार्याची दखल घेऊन शासनासह विविध संस्था, संघटनांच्या असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. मानद वन्यजीव रक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. आणखी वाचा-‘या’ राज्यांतून होते चंद्रपूरमध्ये शस्त्रांची तस्करी काळणे यांना कर्करोगसारख्या गंभीर आजाराने २०१८ मध्ये ग्रासले होते. जीभ आणि घशाचा कर्करोग झाल्याने जीव धोक्यात आल्यावरही परिस्थिती पुढेही खचून न जाता त्यांनी आपली सर्प व समाजसेवा अखंडितपणे सुरूच ठेवली. . २०१९ मध्ये त्यांनी कर्करोगावर मात केली. ७९ टक्के अपंगत्व आल्यावर देखील त्यांनी आपल्या कार्यात कुठलाही खंड पडू दिला नाही. कर्करोगावर जनजागृती करून रुग्णांचे मनोबल वाढवण्याचे कार्य ते पार पाडतात. आणखी वाचा-शिष्यवृत्ती प्रकरणात नऊ महाविद्यालयांना समाज कल्याणचा इशारा असंख्य अजगर, प्राण्यांनाही वाचवले सर्पमित्र बाळ काळणे यांनी चार मोठे अजगर एकाचवेळी एकाच ठिकाणी वाचवून आतापर्यंत एकूण ५० अजगरांना जीवदान दिले आहे. अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव सर्पमित्र आहेत. अत्यंत दुर्मिळ अलबिनो सहा साप, चार ‘इंडियन एग इटर’, १२ मांडुळ साप आदींनाही त्यांनी पकडून जंगलात सोडले. यासोबत त्यांनी माकड, कोल्हे, काळवीट, अस्वल आदींसह अनेक वन्यप्राणी व पक्ष्यांचे जीव वाचवले आहेत. "जीवनात निसर्ग व सर्पसेवेचे ध्येय ठरवले. शेवटच्या श्वासापर्यंत सर्पसेवेचे आपले कर्तव्य बजावणार आहे." -बाळ काळणे, ज्येष्ठ सर्पमित्र, अकोला.