वर्धा : पक्षी व प्राणी ही नैसर्गिक संपदा जपल्या जावी, हे सु्बुद्ध नागरिकांचे कर्तव्य समजल्या जाते. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर म्हणून केंद्र व राज्य सरकारे त्यासाठी उपाय योजत आहे. गिधाडे, माळढोक या पक्ष्या साठी कृत्रिम संगोपणाचे प्रयत्न यशस्वी पण ठरले. काही प्रयोग सूरू आहेत. आता या साखळीत आणखी एका पक्ष्याची भर पडली आहे. त्यासाठी सरकार तर प्रयत्न करणारच. पण लोकांचा सहभाग पण घेतल्या जात आहे. काय हा उपक्रम ते बघू या.
वैवाहिक निष्ठचे प्रतीक
भारतीय संस्कृतीत आजन्म आणि वैवाहिक एकनिष्ठेचे प्रतीक मानला जाणारा आणि जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी म्हणजे ‘सारस क्रौंच’ (Sarus Crane). भारतात या पक्ष्याला वाघांइतकेच सर्वोच्च संरक्षण प्राप्त आहे. मात्र, अलीकडच्या काळात या डौलदार पक्ष्याच्या संख्येत चिंताजनक घट होत असल्याने, त्याच्या संवर्धनासाठी आता ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (BNHS) एक पाऊल उचलले आहे. देशभरातील सारस पक्ष्यांची अचूक वैज्ञानिक नोंद घेण्यासाठी बीएनएचएसने १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पहिल्यांदाच ‘अखिल भारतीय सारस सर्वेक्षण’ आयोजित करण्याची मोठी घोषणा केली आहे. १० ऑक्टोबरच्या ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिना’चे औचित्य साधून ही महत्त्वपूर्ण मोहीम राबविली जाणार आहे.
अस्तित्वाला वाढता धोका
सारस क्रौंच हा भारताचा एकमेव स्थानिक निवासी क्रौंच पक्षी आहे. सुमारे दीड मीटर उंच असणारा हा पक्षी ‘आययूसीएन’च्या (IUCN) यादीत ‘असुरक्षित’ (Vulnerable) म्हणून नोंदवला गेला आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार (अनुसूची १) या पक्ष्याला वाघाच्या बरोबरीचे कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. तरीही अधिवासाचा विनाश, कीटकनाशकांचा अतिवापर आणि वीजतारांचा धोका यामुळे या पक्ष्याच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षांत तब्बल ७६ टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा धक्कादायक अहवाल ‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स’ने दिला आहे.
केवळ पक्षी नव्हे तर
सारस केवळ एक आकर्षक पक्षी नाही, तर तो आपल्या निरोगी पाणथळ आणि कृषी परिसंस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा ‘सूचक’ मानला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरातपासून आसामपर्यंत आढळणारा हा पक्षी आज मोजक्याच राज्यांमध्ये उरला आहे. महाराष्ट्रातही या पक्ष्यांचे अस्तित्व केवळ तुरळक प्रमाणात शिल्लक आहे. सध्या हा पक्षी मानवी वस्तीच्या आसपास जीवन जगत असल्याने त्याला अनेक संमिश्र धोक्यांचा सामना करावा लागत आहे. विजेच्या उघड्या तारांना धडकून होणारे मृत्यू, मोकाट कुत्र्यांची शिकार, आणि पाणथळ जागांचे वेगाने होणारे आकुंचन यांसारख्या समस्यांनी या प्रजातीला विळखा घातला आहे.
केवळ मोजणी नाही तर
बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांनी या मोहिमेचे महत्त्व विशद करताना सांगितले की, या देशव्यापी सर्वेक्षणातून आपल्याला सारस पक्ष्यांची नेमकी संख्या, त्यांचे सुरक्षित अधिवास आणि त्यांना भेडसावणारे धोके समजण्यास मदत होईल.यामुळे सर्व राज्यातील सद्यस्थिती कळेल. सोबतच त्याच्या अधिवासात असणारे धोके सुद्धा माहित पडतील, असे मत रिठे यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केले. सर्वेक्षणातून मिळणारा डेटा राष्ट्रीय स्तरावरील संवर्धन धोरणे निश्चित करण्यासाठी पायाभूत ठरेल. यातून पाणथळ जागांचे पुनरुज्जीवन करणे आणि शेतकरी-स्नेही संवर्धन योजना राबवणे शक्य होईल, असे म्हटल्या जाते.
नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
बीएनएचएसने राज्य वन विभाग, संशोधन संस्था, स्थानिक समुदाय, शेतकरी आणि पक्षीनिरीक्षकांसह सामान्य नागरिकांनाही या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. १० आणि ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत आपल्या जवळच्या पाणथळ जागांना भेट देऊन सारस पक्ष्यांच्या नोंदी saruscranesurvey@gmail.com या ईमेलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही केवळ एका पक्ष्याची मोजणी नसून, आपल्या समृद्ध जैवविविधतेचे अस्तित्व टिकवण्याची चळवळ आहे, ज्यामध्ये जनसहभाग अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
