नागपूर रेल्वे स्थानकावरील भार कमी होणार

अजनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटेलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येत असून तीन रेल्वेगाडय़ा येथून सोडण्यात येणार आहेत. नागपूर रेल्वे स्थानकाऐवजी अजनीहून रेल्वेगाडय़ा सोडण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने अजनी ‘सॅटलाईट स्टेशन’ होत आहे.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटरवरील अजनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटेलाईट स्टेशन’ घोषित केले होते. या रेल्वे स्थानकाचा उद्देश मुख्य नागपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाडय़ांचा आणि प्रवाशांचा ताण कमी करणे आहे. अजनीला अधिकाधिक गाडय़ांचे थांबे देण्याची जुनी मागणी आहे. मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या गाडय़ांना थांबे देण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. या मागण्यांचा विचार करता येथून काही गाडय़ा सोडण्यात यावे, असा विचार पुढे आला. त्यातून अजनीला ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. या स्थानकाला याआधी ‘मॉडेल स्टेशन’च्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते.

तसेच टर्मिनल म्हणून विकसित करण्याची योजना होती. परंतु केवळ सहा ते सात गाडय़ांचा काही मिनिटांचे थांबे देण्यात आले होते. परंतु ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्याच्या घोषणेनंतर अमरावती, काझीपेठ आणि एलटीटी या गाडय़ा येथून सोडण्यात येत आहेत. यापुढे काही महिन्यांनी पुण्यासाठी गाडी येथून सोडण्यात येणार आहे.

नागपूर रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे १२५ गाडय़ांची ये-जा असते. या रेल्वे स्थानकावर दररोज सुमारे ५० हजार प्रवाशांची वर्दळ असते. एवढय़ा प्रमाणात प्रवाशांची संख्या बघता रेल्वे सुरक्षा आणि वाहनतळाची व्यवस्था करणे अडचणी ठरते. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरील भार कमी करता यावा म्हणून नागपूर रेल्वे स्थानकाऐवजी अजनी रेल्वे स्थानकांहून काही गाडय़ा सोडण्यात येत आहेत. अजनी रेल्वे स्थानक पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमधील प्रवाशांना सोयीचे पडते. त्याचा विचार करून अजनीला टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. भविष्यात आणखी काही गाडय़ा येथून सुटतील, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील म्हणाले.

गोधनी ‘सॅटेलाईट स्टेशन’ प्रस्तावित

नागपूर दिल्ली मार्गावरील गोधनी रेल्वे स्थानकाला ‘सॅटलाईट स्टेशन’ म्हणून विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे भविष्यात दिल्ली मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाडय़ा या रेल्वे स्थानकावरून सुटतील. सध्या अजनी रेल्वे स्थानकावरून अमरावती, काझीपेठ आणि एलटीटी (मुंबई)करिता रेल्वेगाडी सोडण्यात येत आहेत. यापूर्वी या तीनही गाडय़ा नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकांहून सोडण्यात येत होत्या. अशाप्रकारे अजनी रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी अजनी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ आणि ३ वर सुविधा उपलब्ध करण्यात आली.

‘सॅटेलाईट स्टेशन’ म्हणजे काय?

शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाडय़ांची गर्दी कमी करण्यासाठी शहरातील दुसऱ्या एका स्थानकावर काही गाडय़ा सोडण्याची व्यवस्था केली जाते. मुख्य रेल्वेला पर्यायी रेल्वे स्थानक विकसित केले जाते. त्या रेल्वे स्थानकाला रेल्वेगाडी थांबण्याची आणि तेथूनच सोडण्यात येऊ शकेल, अशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्यात येतात.