नागपूर : ‘सॅटेलाईट टॅग’ केलेली चारही ‘ऑलिव्ह रिडले’ कासवे गुजरात, कर्नाटकची भ्रमंती करून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली आहेत. चारपैकी तीन कासवे एकत्र येण्याची दाट शक्यता भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी आलेल्या पाच ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटेलाईट टॅग करून समुद्रात सोडले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबवण्यात आला. यातील सॅटेलाईट टॅग केलेला पहिला प्रथमा असे नाव दिलेले कासव गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचला होते. यानंतर त्याने पुन्हा परतीचा मार्ग स्वीकारत वेळासचा समुद्र किनारा गाठला. या कासवाची समुद्राच्या आत ८० किलोमीटर खोल भ्रमंती सुरू होती. प्रथमा कासव आता दक्षिणेकडे जाण्याचे संकेत आहेत. याचबरोबर, आणखी एक कासव कर्नाटक-मंगलोर-लक्षद्वीप परिसरात पोहोचला आहे. सावनी आणि वनश्री ही दोन्ही ‘सॅटेलाईट टॅग’ केलेली कासवे महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर आहेत. सावनी मालवणच्या किनाऱ्यापासून लांब अंतरावर, तर वनश्री दक्षिणेकडील समुद्राच्या भागात कमी वेगाने जात आहे. रेवा हे कासव मात्र गेल्या तीन महिन्यांपासून एकाच ठिकाणी होते, पण आता ते गोव्याच्या दिशेने समुद्रात जात असल्याचे दिसून येत आहे. रेवा आणि वनश्री ही कासवे जवळजवळ असून प्रथमा आणि सावनी ही कासवे रेवाकडे येऊ शकतात, असे भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि ओडिशामधील कासवांमध्ये प्रचंड अंतर आहे. ओडिशातील कासवांच्या स्थानांतरणाचा अभ्यास केल्यानंतर ते श्रीलंकेकडे जाऊन परत येतात, असे लक्षात आले. विणीच्या हंगामात येथील कासवे लाखोंच्या संख्येने एकाचवेळी येतात. महाराष्ट्रात मात्र एक-एक कासव अंडी घालून जातो. त्यामुळे महाराष्ट्रात कासवांचे स्थानांतरण कुठेकुठे होते, त्यांच्या विणीची, अंडी घालण्याची प्रक्रिया कशी असते, याचा अभ्यास करण्यासाठी ऑलिव्ह रिडले कासवांना ‘सॅटेलाईट टॅग’ करण्यात आले. त्यातूनच कासवांच्या परतीची आणि एकत्र येण्याची चाहूल लागली आहे.

– डॉ. सुरेश कुमार, शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था