नागपूर : पंतप्रधान घरकूल योजनेच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या घरकुलाचा लाभार्थ्यांना आनंद व समाधान आहे, मात्र बांधकामाच्या दर्जासह इतरही सुविधांबाबत ते नाराजी व्यक्त करतात. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे पंतप्रधान घरकूल योजनेतून मौजा वांजरी व मौजा तरोडी (खुर्द), येथे लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप करण्यात आले. तरोडी येथे इमारतीमध्ये ३७ सदनिका आहेत. तेथे १४ कुटुंब राहतात. त्यांना येथे येऊन मे २०२२ मध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे. एक वर्षांनंतर या सदनिकांची काय अवस्था आहे, याची पाहणी केली असता सदनिकांची स्थिती उत्तम असल्याचे दिसून आले. तेथे राहणाऱ्या नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, सोबतच त्यांच्या काही तक्रारी देखील आहेत. त्यातील प्रमुख तक्रार म्हणजे एनएमआरडीने पाण्याच्या टाकीवर जे मोटारपंप बसवले आहेत ते कूचकामी ठरले असून वर्षभरात दोन-तीन वेळा नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे येथे राहायला आल्या-आल्या वर्गणी गोळा करून मोटारपंप दुरुस्ती करावी लागली. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही, असे मौजा तरोडी (खुर्द)च्या सदनिकांमधील (बी-५६-००५) रहिवासी जी.एस. राऊत यांनी सांगितले.

साडेसात लाख रुपयांमध्ये साडेतीनशे चौरस फुटाची सदनिका मिळाली आहे. हे घर लहान असले तरी हवेशीर आहे. वाहन ठेवण्यासाठी जागा आहे. तसेच मुलांना खेळासाठी भरपूर जागा आहे. परंतु बांधकामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये पाण्यासाठी जमिनीत टाकी आहे. त्यावरील झाकण एका दिवसात तुटले. त्यासाठी पुन्हा वर्गणी गोळा करावी लागली.

स्नानगृहाच्या भिंतीमधून पाणी गळते. अनेक इमारतींमध्ये सांडपाणी भिंतीवर झिरपते. याशिवाय घाई-गडबडीत इमारतीचे काम केले की काय, अशी शंका येथील लोकांनी व्यक्त केली. येथील एका महिलेने पहिल्या माळय़ावरील त्यांच्या प्रवेशद्वारासमोरील असमतल भाग दाखवला. त्या म्हणाल्या, पावसाचे पाणी असो किंवा एखाद्याने आपल्या प्रवेशद्वारासमोरील जागा स्वच्छ करण्यासाठी पाणी टाकल्यास ते येथे साचते. त्यामुळे येण्याजाण्याची समस्या निर्माण होते. हे पाणी निघून जावे म्हणून काहींनी मधून भिंतीला भोक पाडले तर ते पाणी खालच्या येण्याजाण्याचा मार्गावर पडते. त्यामुळे आपसात भांडणे होत आहेत.

पथदिवे हवेत

सिम्बॉसिस कॉलेजपासून अर्धा किलोमीटर तरोडी खुर्द येथे पंतप्रधान घरकूल योजना आहे. या भागात पथदिवे नसल्याने लोकांना त्रास होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रार दिली. रिंग रोडपासून काही अंतरावर पथदिवे दिले. परंतु या घरकूल योजनेपर्यंत ते लावण्यात आलेले नाहीत. हा भाग नवीन असून ग्रामीण आहे त्यामुळे इकडे नागपूर महापालिकेची कचरागाडी येत नाही, असेही जी.एस. राऊत म्हणाले.