अकोला : देशात दुधाच्या वाढत्या मागणी सोबतच उत्पादनात देखील भरीव वाढ होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अधिक उत्पादन देणाऱ्या पशूंच्या संगोपनाकडे दूध उत्पादकांचा भर असतो. भरीव उत्पादन देणाऱ्या गाई-म्हशीच्या जातीच्या शोधात उत्पादक असतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

सातपुडा पर्वत रांगेतील दुर्गम भागात संगोपन होत असलेल्या मेळघाटी म्हशीला राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. अधिक स्निग्धांश युक्त दूध देण्याची या म्हशीची क्षमता असून उत्पादन देखील उत्तम असल्याची माहिती पशु वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

महाराष्ट्रातील नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी पूर्णाथडी म्हशींच्या नोंदीकृत जातीसह विदर्भातील स्थानिक मेळघाटी म्हशीला अधिकृत जात म्हणून मान्यता मिळाली. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांना मेळघाटी म्हशीचे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. अकोल्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावशे, प्रकल्प संशोधक डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. प्रवीण बनकर आणि डॉ. प्राजक्ता कुरळकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले.

म्हशीची उत्पादन आणि पुनरुत्पादन क्षमता उत्तम

अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील डोंगरी दुर्गम मेळघाट भागात स्थानिक भटक्या आदिवासी आणि गवळी समाजाकडून अनेक पिढ्यांपासून मेळघाटी म्हशीचे संगोपन केले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या भागात प्रामुख्याने आढळणारी मेळघाटी म्हशीला पहाडी असे देखील संबोधले जाते. काळा कुळकुळीत रंग, केसाळ कातडी, मध्यम आकाराची वर व आतल्या बाजूने वळणारी वक्राकार शिंगे, सपाट कपाळ, माथा ही प्रमुख बाह्यरूप म्हशीचे आहेत. मेळघाटी म्हशीची उत्पादन आणि पुनरुत्पादन क्षमता उत्तम असून स्थानिक डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे जुळवून घेते.

मेळघाटी म्हशीच्या खव्याला बाजारपेठेत विशेष मागणी

अधिक स्निग्धांश युक्त दूध देण्याची क्षमता मेळघाटी म्हशीत आहे. दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण सरासरी सात टक्के असून दुधापासून खवा, तूप असे दुग्धजन्य पदार्थ पशुपालकांकडून बनवले जातात. मेळघाटी म्हशीच्या खव्याला स्थानिक बाजारपेठेत विशेष मागणी असल्याची माहिती अकोल्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण बनकर यांनी दिली. राष्ट्रीय मानांकन प्राप्त झालेल्या म्हशीच्या या जातीला दूध उत्पादकांकडून अधिक प्रमाणात मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.