अमरावती: सूर्यमालेतील सर्वात देखणा आणि विलोभनीय कड्यांचे (रिंग) लेणे लाभलेला शनी ग्रह येत्या ४ ऑक्टोबर रोजी पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे. या दिवशी शनी ग्रह अगदी सूर्याच्या समोरासमोर येणार असून खगोलशास्त्रात या स्थितीला ‘प्रतियुती’ (Opposition) म्हटले जाते. या कालावधीत पृथ्वी आणि शनीमधील अंतर सरासरी कमी असल्याने खगोलप्रेमींना शनीची मनमोहक कडी अधिक स्पष्टपणे पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
दुर्बिणीची आवश्यकता भासणार
४ ऑक्टोबर रोजी सूर्यास्त होताच पूर्व क्षितिजावर शनी ग्रहाचे आगमन होईल. रात्रभर आकाशात चमकणारा हा ग्रह काळसर पिंगट रंगाचा आणि तेजस्वी दिसत असल्याने तो साध्या डोळ्यांनी सहज ओळखता येईल; मात्र शनीची जगप्रसिद्ध कडी पाहण्यासाठी साध्या डोळ्यांनी ऐवजी चांगल्या क्षमतेच्या दुर्बिणीची आवश्यकता भासणार आहे. पृथ्वी शनीच्या विषुववृत्त पातळीत असते, त्यावेळी ही कडी नीट दिसत नाहीत. मात्र सध्याच्या स्थितीत ती व्यवस्थित न्याहाळता येतील. यापूर्वी शनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी पृथ्वीच्या समीप आला होता.
शनी ग्रहाची काही वैशिष्ट्ये-
कड्याचा विस्तार: शनीची कडी प्रामुख्याने बर्फाच्या कडांपासून बनलेले असून ती सुमारे २ लाख ७० हजार किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेली आहेत.
चंद्र व आकारमान: शनीला एकूण ८२ चंद्र असून टायटन हा त्यांचा सर्वात मोठा चंद्र आहे. या ग्रहाचा व्यास १ लाख २० हजार किलोमीटर असून त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे.
तापमान व घनता: शनीची घनता सूर्यमालेत सर्वात कमी असून पृष्ठभागाचे तापमान उणे १८० अंश सेल्सियस इतके अतिशीत आहे. शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २९.५ वर्षे लागतात.
अभ्यास मोहिमा: कॅसिनो हे शनीचा अभ्यास करणारे पहिले मानव रहित यान होते तर व्हायजर यांनाही या ग्रहाची अत्यंत जवळून छायाचित्र घेतली होती. आतापर्यंत अनेक मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
खगोलीय निरीक्षणातून एक वेगळीच अनुभूती मिळत असते. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे मानवी जीवनावर कोणताही अनिष्ट किंवा वाईट प्रभाव पडत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अंधश्रद्धा अथवा अफवांवर विश्वास न ठेवता या दुर्मिळ खगोलीय चमत्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभाग चे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
