यवतमाळ – खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक दुर्मिळ व नयनरम्य खगोलीय मेजवानी रविवार, ४ ऑक्टोबर रोजी
होणार आहे. या दिवशी सूर्यमालेतील अत्यंत सुंदर आणि कडेधारी शनी ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने सूर्याच्या अगदी समोरासमोर येणार असून, या खगोलीय घटनेला शास्त्रीय भाषेत ‘सूर्य व शनीची प्रतियुती’ असे म्हटले जाते.
प्रतियुती म्हणजे काय आणि तिचे महत्त्व
जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि इतर कोणत्याही बाह्य ग्रहाच्या (जसे की मंगळ, गुरु, शनी) अगदी मध्यभागी एका सरळ रेषेत येते, तेव्हा त्या ग्रहाची ‘प्रतियुती’ होते. ४ ऑक्टोबर रोजी शनीची हीच स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरून दिसणारा शनीचा संपूर्ण भाग सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघेल. एका अर्थी ही शनी ग्रहाची पूर्ण ‘पौर्णिमाच’ असेल. ही स्थिती किमान ५ तास स्पष्टपणे अनुभवता येईल. या दिवशी शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात कमी, म्हणजेच सुमारे १२६ कोटी किलोमीटर (१.२६ अब्ज किमी) राहील. अंतर कमी असल्यामुळे त्याची तेजस्विता +०.३ मॅग्निट्यूड इतकी जास्तीत जास्त असेल. निरभ्र आकाशात साध्या उघड्या डोळ्यांनी तसेच दुर्बिणीच्या साहाय्याने या ग्रहाचे निरीक्षण करणे व छायाचित्रे टिपणे खगोल अभ्यासकांसाठी अत्यंत सोयीचे ठरेल.
शनी ग्रहाची वैशिष्ट्ये आणि खगोलीय स्थान
शनी हा आपल्या सूर्यमालेतील सहावा ग्रह असून तो प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम वायूंचा बनलेला एक महाकाय वायूगोल आहे. शनीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याच्या सभोवतालचे विलोभनीय वलय. हे वलय खडक, बर्फाचे तुकडे, धूळ आणि वायूंचे बनलेले असून ते सुमारे २,८०,००० किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले आहे. हे कडे शनीच्या विषुववृत्ताशी २६.७३ अंशांनी कललेले आहे.
परिक्रमा काळ
शनीला सूर्याभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा मारण्यासाठी तब्बल २९.४६ वर्षे (सुमारे ३० वर्षे) लागतात. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानुसार वैज्ञानिकांनी शनीच्या एकूण २९३ उपग्रहांचा शोध लावला आहे. त्यापैकी ६३ उपग्रहांचे अधिकृत नामकरण झाले आहे. शनीचा सर्वात मोठा उपग्रह ‘टायटन’ हा सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उपग्रह असून, योग्य परिस्थितीत तो साध्या दुर्बिणीतूनही स्पष्ट दिसू शकतो. सध्या शनी ग्रह ‘मीन’ तारकासमूहात स्थित आहे. ४ ऑक्टोबरला सायंकाळी पश्चिमेस सूर्य मावळताच पूर्व क्षितिजावर शनीचे आगमन होईल आणि तो रात्रभर आकाशात विराजमान राहील.
शनीचे भासमान भ्रमण आणि वेळापत्रक
पृथ्वी सूर्याभोवती वेगाने फिरत असल्यामुळे (वार्षिक गतीमुळे) शनी ग्रह आपल्याला २७ जुलै २०२६ पासून ‘वक्री’ (मागे जात असल्यासारखा) भासत आहे. ही स्थिती ११ डिसेंबर २०२६ पर्यंत राहील आणि त्यानंतर तो पुन्हा ‘मार्गी’ होईल.
सूर्याभोवतीच्या शर्यतीत पृथ्वी पुढे जात असल्याने शनी २४ मार्च २०२७ च्या मध्यापर्यंत रात्रीच्या आकाशात दिसेल. त्यानंतर काही दिवस तो सूर्याच्या मागे दडल्यामुळे अदृश्य होईल आणि मे २०२७ पासून पुन्हा पहाटेच्या आकाशात दिसू लागेल. पृथ्वी आणि शनीच्या या गतीमुळे दर ३७९ दिवसांनी ही प्रतियुती पुनरावृत्ती पावते. त्यामुळे यानंतरची पुढील प्रतियुती १८ ऑक्टोबर २०२७ रोजी पाहायला मिळेल.
अंधश्रद्धा दूर सारून आकाशीय सौंदर्याचा आनंद घ्या
शनी ग्रह त्याच्या सुंदर वलयांमुळे खगोलीय दृष्ट्या अत्यंत मोहक दिसतो. मात्र, समाजात शनी ग्रहाबद्दल अनेक गैरसमज व भीती पसरलेली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची ‘साडेसाती’ मानवी जीवनात त्रास किंवा पीडा देते असा समज आहे. परंतु, खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून सर्व ग्रह हे निर्जीव, प्रचंड वस्तुमानाचे अवकाशीय पिंड आहेत जे आपल्यापासून करोडो किलोमीटर दूर आहेत. कोणत्याही ग्रहाचा किंवा अवकाशीय पिंडाचा मानवी नशीब, दैनंदिन व्यवहार किंवा सुख-दुःखाशी कोणताही संबंध नसतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनातील भीती व गैरसमज दूर सारून या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन ‘स्काय वॉच ग्रुप, यवतमाळ’चे अध्यक्ष रवींद्र खराबे, प्रमोद जिरापुरे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राह्मणे, जयंत कर्णिक, पंकज गोपतवार, पूजा रेकलवार, मानसी फेंडर व शुभांगी झिलपे यांनी केले आहे.
