नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेस पक्षांकडून होत असलेला अपमान बघता जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वेगवेगळय़ा विभागासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडे या गौरव यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात आमदार संजय कुटे व रणधीर सावरकर आणि पूर्व विभागात आमदार प्रवीण दटके आणि विजय रहांगडाले यांच्यावर या गौरव यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांच्या त्यांच्या भागात सहभागी होतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले. सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणी शंकर अय्यर यांच्या प्रतिमेला बाळासाहेबांनी चपल मारली होती. आता उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारण्याची हिंमत करणार का, असा सवाल बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांना काँग्रेसशी फारकत घेण्याबाबत मंगळवार सकाळपर्यंतची वेळ दिली होती. त्यांनी फारकत घेण्याचे जाहीर केले असते तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी स्वत: गेलो असतो असे बावनकुळे यांनी सांगितले.