नागपूर : ‘सागरा प्राण तळमळला…’ या गीताला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री विजय पुरम येथे सावरकरांच्या तेजस्वी आणि भव्य पुतळ्याचे अनावरण १२ डिसेंबर रोजी करण्यात आले. या पुतळ्याची संकल्पना येथे सादर झालेल्या सांस्कृतीक-सांगीतिक सोहळ्याची संपूर्ण संकल्पना मुंबई येथील ‘व्हॅल्यूएबल ग्रुप’चे संस्थापक व मुळचे नागपूरकर अमेय हेटे यांची होती. त्यांनी ही अभूतपूर्व अशी संकल्पना प्रत्यक्षात यावी म्हणून गेले काही महिने अथक प्रयत्न केले आणि या पुतळ्याबरोबरच संपूर्ण कार्यक्रमाची एक रेखीव अशी आखणी केली.

सावरकरांच्या तेजस्वी आणि भव्य पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बेवदनाबाद येथील सार्वजनिक उद्यानात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या पुतळ्याची रचना प्रख्यात शिल्पकार दिवंगत राम सुतार यांची आहे.

एडमिरल (नि)देवेंद्र कुमार जोशी, माननीय लेफ्टनंट गव्हर्नर, श्री विजयपूरम आनंद अंदमान निकोबार आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यावेळी विशेष अतिथी होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्फोर्मेशन अँड टेक्नोलॉजी ऑडीटोरीयम येथे झालेल्या कार्यक्रमात एक विशेष सांस्कृतिक मानवंदना अर्पण केली. सावरकरांच्या गीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले.

जयदेव जयदेव, हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला….यांसारखी गीते त्यांनी सादर केली. यावेळी सावरकरांचे साहित्य प्रकाशित करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे लेखक विक्रम संपत, अभिनेते आणि वक्ता शरद पोंक्षे, आणि ज्यांनी ‘वीर सावरकर’ चित्रपटात सावरकर यांची भूमिका पार पाडली ते अभिनेते रणदीप हुडा आदी मान्यवरसुद्धा उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन ‘मेराक इव्हेंटस चे मंजिरी हेटे आणि प्रसाद महाडकर यांनी केले. संचालन अमर कुळकर्णी यांनी केले. तसेच संदीप बारस्कर यांनी या विशेष अशा मानवंदना सोहळ्याची संपूर्ण तांत्रिक बाजू सांभाळली.

कुणी वक्ता बोलावण्याऐवजी त्यांच्याच गाण्याचा कार्यक्रम करण्याचे ठरले. त्यात मलाही सामावून घेण्यात आले. मात्र, सांगितिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या साहित्याचे काय, हा प्रश्न होता. अंदमान अजूनही विकसित नाही. तिथे जी कनेक्टिव्हीटी आहे, ती पाण्याचीच. त्यामुळे नागपुरातून साहित्य न्यायचे कसे हा प्रश्न होता. आम्ही एका स्थानिकाला पकडले आणि मग चेन्नईवरुन ओळखीचा वापर केला. तेथून सामानाची जुळवाजुळव झाली. अतिशय भव्यदिव्य आणि स्वप्नवत असा हा साेहोळा पार पडला, असे संदीप बारस्कर यांनी सांगितले.