नागपूर : ‘ही राखीव वनजमीन आहे, येथे वृक्षारोपण करता येणार नाही’, असे सांगत बेला ग्रामपंचायत आणि ‘सह्याद्री देवराई फाऊंडेशन’ला जागा देण्यास नकार देणारा वन विभाग अखेर नरमला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर बेला गावालगत वृक्षारोपण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘वनक्षेत्रात वृक्षारोपण करता येत नाही, असा नियमच नाही’
बेला ग्रामपंचायतीने सह्याद्री देवराई फाऊंडेशनच्या सहकार्याने गावालगत देवराई उभारण्यासाठी वन विभागाकडे जागेची मागणी केली होती. मात्र, संबंधित जागा राखीव वनक्षेत्र असल्याने ती देवराईसाठी देता येणार नाही आणि तेथे वृक्षारोपणासही परवानगी देता येणार नसल्याची भूमिका वन विभागाने घेतली होती. या भूमिकेवर शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. वनक्षेत्र म्हणून कागदोपत्री नोंद असलेल्या जागेवर झाडे नाहीत; उलट तेथे अतिक्रमण करून शेती केली जात आहे. मग वृक्षलागवडीला परवानगी देताना कायद्याचा बडगा आणि अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्ष का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भूमिका बदलली?
या प्रकरणाची माध्यमांमधून चर्चा झाल्यानंतर शिंदे यांनी नागपूरमध्ये वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत वनक्षेत्रात वृक्षारोपण करता येत नाही, असा कोणताही नियम नसल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच बेला गावालगतच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात येईल आणि तेथील अतिक्रमण वन विभागाकडून हटविले जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सुरुवातीला जागा देण्यास आणि वृक्षारोपणास नकार देणाऱ्या वन विभागाच्या भूमिकेत आता बदल झाल्याचे चित्र आहे. सयाजी शिंदे यांच्या आक्षेपानंतर वन विभागाने घेतलेली नरमाईची भूमिका हा या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘कोण चूक, कोण योग्य याच्या वादात पडणार नाही’
‘कोण चूक आणि कोण योग्य, याच्या वादात आता आम्हाला पडायचे नाही. जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणार आहोत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. बेला परिसरात सध्याच्या जागेबरोबरच आणखी २५ एकर जागेची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विदर्भात १०० देवराया उभारण्याचा संकल्प
विदर्भात मोठ्या प्रमाणावर देवराया उभारण्याचा मानस असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आगामी काळात १०० देवराया उभारण्याचा प्रयत्न असून प्रत्येक देवराईमध्ये किमान ५०० प्रजातींच्या वृक्षांचा समावेश असावा, अशी संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या १०० वर्षांत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून आपण पर्यावरणाचे नुकसान केले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान लक्षात घेता आता तरी वृक्षारोपणाबाबत गंभीर होण्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले. बेला येथील जागेवरील अतिक्रमण प्रत्यक्षात कधी हटविले जाते आणि त्यानंतर देवराई उभारणीला कितपत गती मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.
