नागपूर : ज्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी स्वराज्याच्या इतिहासाला बळ दिले, त्याच पर्वतरांगा, घनदाट जंगले, नद्या, जैवविविधता आणि पर्यावरण आज विकासाच्या नावाखाली होणाऱ्या विनाशकारी हस्तक्षेपांमुळे धोक्यात आहेत. महाराजांचे गडकिल्ले नष्ट करण्याचा हा कुटील डाव आहे, असा आरोप अभिनेते व वृक्षप्रेमी सयादी शिंदे यांनी केला.

माणसापेक्षा झाडांचा इतिहास मोठा

नागपूर हा देशाचा केंद्रबिंदू आहे. हे शहर राज्याची उपराजधानी आहे. तिची ओळख संत्रानगरी म्हणून आहे. तसेच संघभूमी म्हणूनही नागपूरची ओळख आहे. या संघभूमीतून ‘सेव्ह सह्याद्री’ या देशव्यापी चळवळीची सुरुवात या शहरातून करण्यात आली. सयाजी शिंदे यांनी या चळवळीच्या माध्यमातून जनतेला सह्याद्री वाचवण्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांनी माणसे विस्थापित करा, पण झाडांना विस्थापित करु नका, असे सांगितले. माणसापेक्षा झाडांचा इतिहास मोठा असल्याचे ते म्हणाले.

शिवरायांचा वारसा जपण्यासाठी एकजुटीने उभे राहावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा साक्षीदार असलेला सह्याद्री हा केवळ महाराष्ट्राच्या भूगोलाचा भाग नसून आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि नैसर्गिक वारशाचा तो अविभाज्य घटक आहे. शिवरायांनी गडकिल्ले, निसर्ग आणि स्थानिक भौगोलिक परिस्थितीचे महत्त्व ओळखून उभारलेला वारसा जपणे म्हणजेच त्यांना अभिवादन करणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीने सह्याद्रीच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

झाडांसकट महाराष्ट्र विकायला काढला

विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राला फसवले जात आहे. झाडांसकट संपूर्ण महाराष्ट्रच विकायला काढला आहे. झाडे ही सेलिब्रिटी आहेत आणि झाडखाऊ नावाचा व्हायरस या सेलिब्रिटीला संपवायला निघाला आहे. तेव्हा हा झाडखाऊ नावाचा व्हायरस पळवून लावायचा आहे, असे सयाजी शिंदे म्हणाले. जोपर्यंत एकही झाड तोडणार नाही, असे आश्वासन सरकार देत नाही आणि ते पाळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे शिंदे म्हणाले.

नागरिकांनी सरकारला हिशेब विचारावा

आतापर्यंत किती झाडे तोडली, किती लावली आणि त्यातली किती जगली याचा काहीही हिशेब नाही. त्यामुळे नागरिकांनी हा हिशेब सरकारला विचारायला हवा. आताही सहयाद्रीत प्रकल्पाच्या नावाखाली झाडे तोडली जात आहे. डोंगर पोखरला जात आहे. मोबदल्यात सरकार झाड लावण्याचे नाटक करत आहे, सोग करत आहे, असा आरापही सयाजी शिंदे यांनी केला. सहयाद्रीत फक्त झाडेच तोडली जात नाहीत आहेत, तर हजारो विहिरी नष्ट केल्या जात आहेत. फसवणाऱ्यांना फसवण्याचा रोग लागला आहे, असे ते म्हणाले.