नागपूर : विकासाच्या नावाखाली डोंगर, जंगले आणि वृक्षसंपत्तीवर घाव घातला जात असल्याचा आरोप करत अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण झाली आहे, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी राज्यातील वृक्षतोडीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजार झाडे तोडली जाणार असल्याचा दावा करत या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी ‘सेव्ह सह्याद्री’ आंदोलनाची हाक दिली. नागपुरातून सोमवारी या चळवळीची सुरुवात करण्यात आली.
झाडांसह महाराष्ट्र विकायला काढला
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये विविध प्रकल्पांच्या माध्यमातून होणारे हस्तक्षेप म्हणजे केवळ पर्यावरणाचे नुकसान नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ‘झाडांसकट संपूर्ण महाराष्ट्रच विकायला काढला आहे’, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या विकासाच्या संकल्पनेवर टीका केली. सरकारने एकही झाड तोडले जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
माणसे विस्थापित करा, झाडे नाही
वीज आणि विकास माणसासाठी आवश्यक असला, तरी त्यासाठी हजारो झाडांचा बळी का द्यायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘वीज माणसासाठी हवी असेल तर माणसाला विस्थापित करा, झाडांना नाही’, अशी भूमिका मांडत त्यांनी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूच्या अधिवासालाही धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
झाडांमुळे माणसे, माणसांमुळे झाडे नाही
‘मुख्यमंत्री असोत, पंतप्रधान असोत किंवा सर्वसामान्य नागरिक, प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो. हा ऑक्सिजन कोट्यधीश देत नाहीत, तर झाडे देतात. झाडांमुळे माणसे आहेत; माणसांमुळे झाडे नाहीत’, असे सांगत शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ वृक्षारोपणाच्या घोषणा करून पर्यावरणाचे संरक्षण होणार नाही. राज्यात आतापर्यंत किती झाडे तोडली, किती लावली आणि त्यातील प्रत्यक्षात किती जगली, याचा हिशेब सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
वृक्षारोपणाच्या नावाखाली दिखावा
वृक्षारोपणाच्या नावाखाली होणारा दिखावा उघड करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लावलेल्या झाडांची आणि त्यांच्या सद्यस्थितीची माहिती नागरिकांनी गोळा करावी, असे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणाच्या प्रश्नावर केवळ सरकारवर टीका करून थांबण्याऐवजी नागरिकांनी घराबाहेर पडून आंदोलनात सहभागी व्हावे. ही चळवळ केवळ कर्जत किंवा सह्याद्रीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे, असेही ते म्हणाले. दिवाळी साजरी करण्यापेक्षाही सह्याद्रीच्या संरक्षणासाठी उभे राहण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करत त्यांनी या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन देण्याचे आवाहन केले.
