नागपूर : तुमचे धनादेश, रोख व्यवहार किंवा शाखेत जाऊन करावे लागणारे बँकेचे काम प्रलंबित आहे? तर ते २८ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करून घ्या, असा संदेश भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर पाठविला जात आहे. काही कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप पुकारल्याने सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सलग पाच दिवस शाखांमधील व्यवहारांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांना केवळ पूर्वसूचना देऊन बँकेची जबाबदारी संपते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्टेट बँकेच्या संदेशात नेमके काय म्हटले आहे?
काही बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांच्या संपाचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी महत्त्वाचे बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करून घ्यावेत, असे बँकेने म्हटले आहे. बँकिंग गरजांसाठी एटीएम, स्वयंचलित ठेव यंत्रे, ग्राहक सेवा केंद्र, ‘योनो’, यूपीआय आणि अन्य डिजिटल सेवांचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
संप कोणी पुकारला आहे?
‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. कामगार विभागासोबतची सलोखा बैठक निष्फळ ठरल्यानंतर संघटनांनी संपावर जाण्याची भूमिका कायम ठेवल्याचे वृत्त आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी संघटनांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
ग्राहकांमध्ये चिंता का वाढली?
महिनाअखेर वेतन, निवृत्तिवेतन, कर्जाचे हप्ते, धनादेश वटविणे, रोख रक्कम जमा करणे आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. याच काळात तीन दिवसांचा संप होत असल्याने शाखांतील सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यात शनिवार आणि रविवारची भर पडल्यामुळे ग्राहकांना सलग पाच दिवस शाखेतील सेवा मिळतील का, असा प्रश्न पडला आहे.
ग्राहकांचा आक्षेप काय आहे?
ग्राहकांना संभाव्य गैरसोयीची पूर्वसूचना देणे आवश्यक असले, तरी संपाच्या काळात सेवा सुरळीत ठेवण्यासाठी बँकेने केलेल्या पर्यायी व्यवस्थेची स्पष्ट माहितीही द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्या शाखा सुरू राहतील, धनादेशांचे व्यवहार कधी पूर्ण होतील, रोख रकमेचा पुरेसा साठा एटीएममध्ये राहील का आणि डिजिटल व्यवहारात अडथळा आल्यास तक्रार कुठे करायची, याबाबत संदेशात माहिती नसल्याने संभ्रम वाढत आहे.
सर्व सेवा पूर्णपणे बंद राहतील का?
संप झाला तरी ‘योनो’, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, एटीएम आणि स्वयंचलित ठेव यंत्रांसारख्या डिजिटल सेवा सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, रोख रक्कम भरणे किंवा काढणे, धनादेश निकाली काढणे आणि शाखेत प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असलेली कामे प्रभावित होऊ शकतात. संप प्रत्यक्षात होणार की चर्चेनंतर मागे घेतला जाणार, याबाबत ग्राहकांनी बँकेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.
ग्राहकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
तातडीचे धनादेश, मोठ्या रकमेचे व्यवहार, कर्जाशी संबंधित कागदपत्रे आणि शाखेत करावी लागणारी कामे शक्यतो आधी पूर्ण करावीत. एटीएम किंवा डिजिटल सेवांचा वापर करताना अनोळखी दुवे उघडू नयेत आणि ओटीपी, गोपनीय क्रमांक किंवा खात्याची माहिती कोणालाही सांगू नये.
