अमरावती : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) संकलित मूल्यमापन चाचणी (PAT-2) चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने राज्यातील शैक्षणिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरअखेरीस अपेक्षित असलेली परीक्षा आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याने पहिल्या सत्राचे मूल्यमापन आणि निकालाची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. परिणामी दुसऱ्या सत्रातील प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपलब्ध होणारा कालावधी कमी होण्याची भीती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी व्यक्त केली आहे.
नेमके काय घडले?
एससीईआरटीने दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पॅट-२ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार २ डिसेंबरला प्रथम भाषा, ३ डिसेंबरला गणित, तर ५ डिसेंबरला तृतीय भाषा इंग्रजीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील दहा माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी लेखी व तोंडी स्वरूपात घेतली जाणार आहे. या परीक्षेमुळे पहिल्या सत्राचा निकाल १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
पहिल्या सत्रातील अध्यापन प्रभावित
यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विविध प्रशासकीय कामांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाल्याचा आरोप शिक्षक समितीने केला आहे. SIR प्रक्रियेमुळे शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर परिणाम झाला. तसेच १५ जून किंवा ३० जूनपासून सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रातील जवळपास तीन महिने विविध कामांमुळे अध्यापनावर परिणाम झाला. अद्यापही SIR चे काम सुरू असून, त्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय विविध कामे व प्रशिक्षणांमुळे शिक्षकांचा बराच वेळ प्रशासकीय कामांमध्ये जात असल्याचे कोंबे यांनी नमूद केले.
दुसरे सत्रही प्रभावित होण्याची शक्यता
प्रत्यक्ष लोकसंख्या गणना २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना, तर १ ते ५ मार्चदरम्यान पुनरावृत्तीचा टप्पा राबविण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरमधील पॅट परीक्षा, त्यानंतर क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, जनगणना प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष लोकसंख्या गणना अशा विविध कामांमध्ये दुसऱ्या सत्रातील अध्यापनाचा महत्त्वपूर्ण कालावधी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यातच दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलांचाही शैक्षणिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो.
अध्यापनाला प्राधान्य देण्याची मागणी
सर्वसाधारणपणे दिवाळीपूर्वी पहिले सत्र संपवून मूल्यमापन केले जाते आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसऱ्या सत्रातील अध्यापन सुरू होते. मात्र यंदा पॅटचे वेळापत्रक बदलल्याने संपूर्ण शैक्षणिक नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
