scorecardresearch

गडचिरोलीच्या तरुणाला विदेशात उच्चशिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती

‘इरासमूस मुंडस’ या ४५ लाखांच्या जागतिक प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीचा मानकरी तो ठरला आहे.

adv bodhi shyam ramteke
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

गडचिरोली: जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहिर झाली आहे. युरोपियन शिक्षण व संस्कृती एक्सजिक्यूटिव संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या ‘इरासमूस मुंडस’ या ४५ लाखांच्या जागतिक प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीचा मानकरी तो ठरला आहे.

बोधी हा कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण दोन वर्ष परदेशात घेईल. बोधीला चार विद्यापीठांच्या संयुक्त कोर्सला प्रवेश मिळाला आहे. जगभरातून केवळ १५ लोकांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

ब्रिटिश सरकारची चेवेनिंग शिष्यवृत्तीधारक वकील ॲड. दीपक चटप, ॲड. वैष्णव इंगोले व ॲड. बोधी रामटेके या तरुण वकीलांनी मिळून पाथ संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम सुरु आहे. शिष्यवृत्तीसाठी सामाजिक व विधिविषयक केलेले काम दखलपात्र ठरले.

आणखी वाचा- नागपूर : देश २०७० पर्यंत कार्बनमुक्त करणार – नितीन गडकरी

बोधी हा नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी होता. पुण्यातील आय.एल.एस. लॉ कॉलेजमध्ये त्याचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले. कायद्याचे शिक्षण घेत असताना समविचारी मित्रांसमवेत विधि विषयक उपक्रम राबविले. कोरो इंडिया संस्थेच्या माध्यमातून समता फेलोशिपमध्ये काम केले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे मूलभूत हक्कांचे प्रश्न पाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्य मानवाधिकार आयोगात पोहचविले. गरोदर महिलांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या म्हणून केलेली याचिका महत्वाची ठरली.

आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणाऱ्या अडचणी यांवर पाथ फाउंडेशनने केलेले संशोधन त्याने इजिप्त येथे आंतरराष्ट्रीय समर स्कूलला मांडले. दुर्गम गावात आवश्यक रस्ते व पुल यांबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहिले. जनहित याचिकेच्या माध्यमातून वेंगणुर भागातील १५०० नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला. उच्च न्यायालयाने सरकारला निधीची तरतूद करत मूलभूत सुविधा देण्याचे आदेश दिले. नुकतेच त्याचे कायदेविषयक माहिती देणारे न्याय हे पुस्तक गाजले.

आणखी वाचा- खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

बोधी सध्या संस्थात्मक कामासोबतच सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणूनही कार्यरत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील या तरुण वकीलाला मिळालेल्या जागतिक शिष्यवृत्तीमुळे त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझ्या उच्चशिक्षणाचा उपयोग तळागळातील घटकांसाठी व्हावा यासाठी कार्यरत राहिल, असे बोधी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 10:22 IST

संबंधित बातम्या