परिवहन विभागाकडून लवकरच निर्णय; नागरिकांच्या सुरक्षेचा दाखला

शहरातील ९ फूट किंवा त्याहून कमी रुंदीच्या रस्त्यांवर स्कूलबस धावण्याला प्रतिबंध घालण्याकरिता प्रादेशिक परिवहन विभाग पुढे सरसावला असून त्यासाठी शहर पोलिसांना अधिसूचना काढण्याची विनंती केली आहे. त्यात अडचणी आल्यास हा विषय जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्याची तयारी परिवहन विभागाने केली आहे.

नागपूर शहरात प्रमुख रस्त्यांना जोडणारे अनेक छोटे रस्ते आहेत. त्यावर कमी- अधिक प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यांवरून (९ फुटापेक्षा कमी) धावणाऱ्या स्कूलबस-व्हॅनमुळे वाहतूक कोंडीसह अपघात वाढत असल्याचे निदर्शनात आले आहे. तशा तक्रारीही नागपूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे छोटय़ा रस्त्यांवरून स्कूलबसला प्रतिबंध घातल्यास अपघातावर नियंत्रण शक्य असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे.

परिवहन विभागाने याबाबत शहर पोलिसांना प्रतिबंधाची अधिसूचना काढण्याची विनंती केली आहे. लवकरच त्यावर निर्णयाची अपेक्षा आहे.

परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यास हा विषय मंजुरीकरिता जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत नेण्याची तयारी परिवहन विभागाने केली आहे. त्यामुळे भविष्यात नागपूरच्या ९ फुटाहून कमी रुंदीच्या मार्गावर स्कूलबस आणि व्हॅन धावताना दिसणार नाहीत. आढळल्यास त्यांच्यावर वाहतूक आणि परिवहन विभागाकडून कारवाई होईल. या निर्णयामुळे मोठय़ा प्रमाणावर शहरातील विद्यार्थ्यांच्या पालकांना सुरुवातीला त्रास होणार असला तरी भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्याची आशा परिवहन विभागाला आहे.

स्कूलबसची संख्या

भाग           नोंदणीकृत

नागपूर शहर     ७६३

पूर्व नागपूर       ९८९

शहरातील छोटय़ा मार्गावरील अपघात नियंत्रणासह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ९ फुटापेक्षा कमी रुंदीच्या मार्गावर स्कूलबस आणि स्कूलव्हॅनला प्रतिबंध घालण्याचा परिवहन विभागाचा विचार आहे. त्याकरिता शहर पोलिसांना विनंती केली असून अधिसूचनेकरिता तांत्रिक अडचण आल्यास परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी हा विषय ठेवला जाईल.

– शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

थांबे सर्वेक्षणचे काम थंडबस्त्यात

जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत शहरातील स्कूलबसचे थांबे निश्चित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार नागपूर महापालिकेच्या परिवहन समितीला सर्वेक्षण करून अहवाल सादर करायचा होता. परंतु महापालिकेने याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हे काम थंडबस्त्यात आहे.