नागपूर: शालार्थ आयडी घोटाळ्यात अनेक अधिकाऱ्यांना आतापर्यंत अटक झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. याचा परिणाम दैनंदिन कार्यालयीन कामावरही होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर थेट शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी पोलीस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांची बुधवारी भेट घेऊन, संपूर्ण चौकशीशिवाय अटकेची कारवाई न करण्याबाबत चर्चा केली. यावेळी दोन्ही विभागाकडून घोटाळ्याच्या चौकशीत एकमेकांना सहकार्य करण्यावरही एकमत झाले.
बोगस शालार्थ आयडी प्रकरणात सदर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केली. त्यानंतर कार्यालयातील लिपिकासह इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. याशिवाय सायबर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील तपासात पुन्हा नरड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. एक महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या एसआयटीद्वारे कर्मचारी लक्ष्मण मंघाम, सेवानिवृत्त विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल पारधी, प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वैशाली जामदार यांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांकडून सतीश मेंढे यांचा शोध सुरू आहे. पोलिसांप्रमाणेच शालेय शिक्षण विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, ही चौकशी सुरू असताना, पोलिसांकडून अधिकाऱ्यांचे सुरू असलेले अटकसत्र यामुळे नागपूर विभागात काम करण्यास अधिकारी इच्छुक नाहीत. त्यातूनच शिक्षण विभागाच्या कामाची गती स्थिरावली आहे. त्यामुळे बुधवारी (ता. ४) शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग आणि प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक गोस्वामी यांनी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
बैठकीत पोलीस आयुक्तांनी एसआयटीमार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत माहिती दिली. दरम्यान शिक्षण विभागाकडूनही करण्यात येत असलेल्या चौकशीचा आढावा पोलिसांना देण्यात आला. यावेळी चौकशीत आवश्यक असलेली कागदपत्रे देण्यावरही एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आता संपूर्ण प्रोटोकाॅल पाळण्यात येणार आहे.
दरम्यान, याबाबत शिक्षण आयुक्त आणि पोलीस आयुक्तांशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शहरात आलेल्या शिक्षण आयुक्तांनी नागपुरातील शालेय शिक्षण विभागााचा आढावा घेतला. यावेळी बोगस शालार्थ आयडी प्रकरणाचीही माहिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांता क्लासही लावल्याची माहिती आहे.
प्रधान सचिव काढणार पत्र?
बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नागपूर विभागातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर उपसंचालकासह, इतर लिपिक आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. दरम्यान आता यापूढे अधिकाऱ्यांना अभय देण्यासाठी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत पत्र काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे पत्र लवकरच पोलीस विभागालाही देण्यात येणार असल्याचे समजते.