नागपूर : वर्धा जिल्ह्यातील करुणाश्रमात माकडांची शाळा भरली आहे. या शाळेत सध्या सहा ‘विद्यार्थी’आहेत, पण दुःखद बाब म्हणजे हे सहाही विद्यार्थी आई पासून दुरावले आहेत. यांची आई यांना कायमची सोडून देवाघरी गेल्याने ही पिल्लं जीवनातील पुढील धडे शिकण्याकरिता करूणाश्रमात दाखल झाली आहेत. शाळेत प्रवेश घेतला की तेथे विद्यार्थ्यांची नावे आधी बघितली जातात. त्याप्रमाणे यांचीही नावे ठेवण्यात आली आहेत .

अंगद, मारुती, सुग्रीव, बाली, केसरी, आणि ही तारा. हे सहाही विद्यार्थी जीवन जगण्याची कला येथे शिकत आहेत. किमान पाच महिन्यात पूर्ण ज्ञान आले की त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जंगलात त्यांना मुक्त केले जाईल. बोलक्यांच्या शाळेत बोलून संवाद होतो. करुणाश्रमाच्या शाळेत मात्र भावनेचा संवाद होतो. शब्द भलेही समजले नाही तरी डोळे आणि हातवारे बरेच काही बोलून दाखवतात. बरेच वेळा वाटतं यांच्या पासूनच खूप शिकावं, कमी बोलावं व अधिक क्षमतेने काम करावं, असे करुणाश्रमाचे आशीष गोस्वामी सांगतात.