भंडारा : शाळांची पटपडताळणी करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने पत्र निर्गमित केले. या पत्रानुसार इयत्ता दुसरी ते आठवीची पटपडताळणी पॅट परीक्षा मूल्यांकनाच्या दिवशीच करण्यात येणार असून इयत्ता नववी व अकरावीची पटपडताळणी ११, १५ व २२ एप्रिल या तीन दिवशी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या पटपडताळणीच्या दिवशीच विशिष्ट विषयांचे पेपर घेणे बंधनकारक करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शासन आदेशानुसार इयत्ता नववीची पटपडताळणी ज्या दिवशी होईल त्या दिवशी मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांचे पेपर घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच इयत्ता अकरावीच्या पटपडताळणीच्या दिवशी मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीचे पेपर घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्यक्षात राज्यातील अनेक माध्यमिक आणि जवळपास सर्वच उच्च माध्यमिक शाळांनी वार्षिक शालेय नियोजनानुसार अंतिम सत्र परीक्षा आयोजित करून निकाल तयारीला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश म्हणजे “वरातीमागून घोडे” असल्याची चर्चा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये सुरू झाली आहे.

शिक्षक संघटनांच्या मते पटपडताळणीला विरोध नाही. मात्र पटपडताळणी आणि परीक्षा या दोन स्वतंत्र प्रक्रिया असून त्या एकाच दिवशी एकत्र राबविणे व्यवहार्य नाही. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार असून त्यातून प्रचंड शारीरिक व मानसिक ताण निर्माण होणार आहे.

अभ्यासावर विपरीत परिणाम

अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची परीक्षा संपून विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी बारावीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीला लागले आहेत. अशा वेळी पुन्हा तीन विषयांच्या परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम करणारे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अतिरिक्त आर्थिक भार

याशिवाय तीन पेपरचे नियोजन, प्रश्नपत्रिका, पर्यवेक्षण, उत्तरपत्रिका तपासणी यासाठी शाळांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. शेवटचा पेपर २२ एप्रिलला असल्याने आणि १ मेपर्यंत निकाल लावण्याची वेळ येणार असल्याने आठ-दहा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत कठीण ठरेल, असे मत मुख्याध्यापकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने पटपडताळणी घ्यावी, मात्र परीक्षा घेण्याचा तुगलकी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्यान, शिक्षक आमदार अडबाले बुधवारी भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना विविध शिक्षक संघटनांनी त्यांना निवेदन देत त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आज या विषयावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पटपडताळणी मान्य, परीक्षा संयुक्तिक नाही

शिक्षक भारतीचे महासचिव विनोद किन्दर्ले म्हणाले, “पटपडताळणीसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य राहील. मात्र अधिकांश कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा आटोपल्या असून निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागोवा घेऊन परीक्षांचे नियोजन करून निकाल लावण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतात. पटपडताळणी आणि परीक्षा एकत्र घेणे संयुक्तिक नाही. स्थानिक शाळांना त्यांच्या वार्षिक नियोजनानुसार परीक्षा घेण्याची मुभा द्यावी.”

विद्यार्थ्यांना मानसिक त्रास

नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी मिताली हिने सांगितले, “आमच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता पूर्ण लक्ष बारावीच्या अभ्यासावर आहे. अशात तीन विषयांच्या पुन्हा परीक्षा देण्याचे आदेश म्हणजे मानसिक ताण वाढवणारे आहेत.”

शिक्षक आमदारांकडे हस्तक्षेपाची मागणी

शिक्षक आमदार अडबाले यांच्या भंडारा दौऱ्यात विविध शिक्षक संघटनांनी निवेदन देऊन या आदेशाबाबत त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली. शासन निर्णयात बदल होतो का, याकडे शिक्षक व पालकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.