महेश बोकडे
शाळेत स्कूल बस, व्हॅनने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेतील शालेय परिवहन समिती सक्रिय हवी. परंतु, नागपुरात करोनाचा शिरकाव झाल्यापासून एकाही शालेय परिवहन समितीची बैठक झाली नाही. समित्यांच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा वाली कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपुरातील बेसा-घोगली मार्गावर ८ ऑगस्टला स्कूलव्हॅन नाल्यात उलटल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधले गेले आहे. शासनाने स्कूल बस नियमावली व धोरण २०१२ पासून लागू केले. त्यात स्कूलबस, व्हॅनबाबत नियमावालीचा समावेश आहे. त्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुने वाहन वापरता येत नाही. वाहनांची अंतर्गत रचना व चालकाबाबतही मार्गदर्शक सूचना स्पष्ट केलेल्या आहेत. प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करायची असून तिची नियमित बैठक व्हायला हवी. परंतु, तीन वर्षांपासून बैठकच झाली नाही.

करोनामुळे मार्च २०२० पासून प्रथम टाळेबंदी व त्यानंतर कडक निर्बंधामुळे शाळा बंद होत्या. करोना नियंत्रणात आल्यावर यंदा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या. त्यामुळे स्कूलबस, व्हॅन पुन्हा रस्त्यावर आल्या. सध्या नागपुरात सुमारे २५ टक्के स्कूलबसेस योग्यता तपासणी न करताच धावत आहेत.
स्कूलबस, स्कूलव्हॅनने नियम भंग केल्यास ‘आरटीओ’कडून कारवाई केली जाते. स्कूलबससंबंधी पालकांच्या समस्या असेल तर त्या परिवहन समितीकडे मांडू शकतात. समित्यांच्या बैठकीसाठी ‘आरटीओ’ प्रयत्नशील आहे. परंतु, शिक्षणाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेतल्यास योग्य होईल. – रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर.

जिल्ह्यातील स्थिती
(जानेवारी २०२० नुसार)
कार्यालय स्कूल व्हॅन/बसची संख्या

नागपूर (श.) ८५९
नागपूर (ग्रा.) १,६६०
पूर्व नागपूर १,०८८

शाळांची संख्या

(वर्ष २०१७ नुसार)

जिल्हा परिषद – १ हजार ५७९
महापालिका – १६४
नगरपालिका – ६९
खासगी – १ हजार १७८
खासगी विना अनुदानित – १ हजार
शासकीय – २१
इतर – ४९