या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तालुकास्तरावरील व शहरातील औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था(आयटीआय) येथे वेगवेगळ्या विषयांत शिक्षण घेतात. राज्यात १० जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये करोना व ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मात्र उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. शासनाच्या या विरोधाभासामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना करोना संसर्ग होण्याचा धोका नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी अशा ९७६ ‘आयटीआय’ असून येथे ९२ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नागपूर जिल्ह्यातच एकूण १३ शासकीय आयटीआय असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७१३ तसेच खाजगी आयटीआयचे विद्यार्थी ७५०० आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्याचा विचार केला तरी आयटीआयचे चौदा हजारांवर विद्यार्थी आहेत. एस.टी. व वसतिगृह बंद असूनही या विपरीत परिस्थितीत आयटीआयच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता त्यांना औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या व्यवसाय शिक्षण उपसंचालकांचे पत्र नाही असे सांगितले. तर उपसंचालकांशी संपर्क साधला असता त्यांना व्यवसाय शिक्षण संचालकांचे पत्र नाही असे सांगण्यात आले. तर संचालक दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना डीजीईटीचे आदेश नाही. ज्याअर्थी शासनाच्या प्रधान सचिव यांनी निर्गमित केलेल्या दिशानिर्देशामध्ये कौशल्य विकास विभागाचा उल्लेख केलेला आहे. त्याचा आधार घेऊन आयटीआय महाविद्यालये बंद करता आली असती. परंतु अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.

कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. तसेच डीजीईटीचे आदेश आम्हाला नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्यात आलेला नाही.  – दिगंबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक.

दिवसेंदिवस करोनाचे संकट वाढत आहे. अशा परिस्थितीत आयटीआयच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये बोलावणे म्हणजे त्यांचे आरोग्य धोक्यात टाकणे आहे. परिस्थितीनुरूप उपसंचालकांनी निर्णय घ्यायला पाहिजे.  – अनिल शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools colleges closed iti student akp
First published on: 17-01-2022 at 00:26 IST