कोटय़वधी रुपयांची उलाढाल; नियंत्रण यंत्रणेकडून दुर्लक्ष
नागपूर : टाकाऊ वस्तूंच्या (भंगार) विक्रीत होणारी कोटय़वधी रुपयांची उलाढाल लक्षात घेता या व्यवसायाचा नागपुरात दिवसेंदिवस विस्तार होत आहे. दुकानाची संख्याही वाढत चालली आहे. दुसरीकडे या व्यवसायात चोरीच्या वस्तूंची खरेदी-विक्री होत असल्याने कायम पोलिसांची नजर असते. त्यामुळे इतर व्यावसायिकांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
काही वस्तूंवर प्रक्रिया करून त्या पुन्हा नव्याने तयार करता येऊ शकतात. यात प्रामुख्याने जुने लोखंड, रद्दी, टीन-टप्पर, प्लास्टिक रबराच्या वस्तू, काच, लोखंडी वस्तू, जुनी वाहने, सायकली, पुष्ठे व तत्सम वस्तूंचा समावेश आहे. या व्यवसायात फेरीवाले व ठोक विक्रेते अशा दोन प्रकारचे व्यावसायिक आहेत. फेरीवाले वस्त्या-वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून टाकाऊ वस्तू खरेदी करतात व ठोक विक्रेत्यांकडे विकतात.
साधारणत: इंदोरा, नारा, कैलासनगर, इंदिरानगर, एमआयडीसी, दाभा, प्रतापनगर, अंबाझरी, अजनी व एमआयडीसी भागात खरेदी-विक्रीची दुकाने आहेत. सुमारे १० हजाराहून अधिक व्यावसायिक या क्षेत्रात आहेत. फेरीवाला दरदिवशी साधारणपणे १५० ते ५०० रुपयांची कमाई करतो. टाकाऊ वस्तूंच्या नावाखाली चोरीच्या वस्तूंची खरेदी-विक्री होत असल्याने हा व्यवसाय कायम पोलिसांच्या रडारवर असतो. कबाडी दुकानदार, फेरीवाले संघटना नागपुरात स्थापन झाली. त्यांचे शहरात दोनशेवर सदस्य आहेत. इतरही फेरीवाले, भंगार व्यावसायिक या संघटनेशी जुळलेले आहेत.अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह भंगार व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा व पोलिसांचा दृष्टिकोन संशयी आहे. त्यामुळे व्यवसायिकांना नाना अडचणींना तोंड द्यावे लागते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई
व्यवसायाआड चुकीचे काम चालत असेल तर पोलिसांकडून कारवाई केली जाते. या व्यवसायातील संशयितांवर पोलिसांचे लक्ष असते. दुकाने किंव गोदामांची आकस्मिक तपासणी केली जाते.
– मनीष कलवानिया, पोलीस उपायुक्त – झोन क्रमांक ५
संशयाने बघू नका
टाकाऊ वस्तूंची (भंगार) खरेदी-विक्री हा सुद्धा एक व्यवसायच आहे. आम्ही चोरी करीत नाही. गैरप्रकार असेल तर जरूर चौकशी करावी. मात्र, संशयित नजरेने पाहू नये, आम्हीही समाजाचे घटक आहोत.
– मंगेश शाहू, भंगार व्यावसायिक.
पोलीस का छळतात?
या व्यावसायिकांवर पोलिसांची नजर असते. कुठेही चोरी झाली तरी सर्वप्रथम पोलीस नोंदणीकृत फेरीवाल्यांकडे जातात. खरेदीची देयके मागितली जातात. या व्यवसायात देयक कोणीच देत नाही. त्यामुळे कारवाईला तोंड द्यावे लागते. असे फेरीवाल्याकडून सांगण्यात आले.
भंगार विक्रेत्याकडे सापडले आधार कार्डचे गठ्ठे
गेल्या आठवडय़ात जरीपटक्यातील मेकोसाबाग येथे एका भंगार विक्रेत्याकडे आधार कार्डचा गठ्ठा सापडला होता. असे अनेक विक्रेते पोलिसांच्या रडावरवर आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिककेची आहे. मात्र त्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
