scorecardresearch

नागपुरात आता ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; दोन रूग्णांवर उपचार सुरू

तर गोंदियातही दोन नवीन रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली

नागपुरात आता ‘स्क्रब टायफस’चा शिरकाव; दोन रूग्णांवर उपचार सुरू
(संग्रहीत छायाचित्र)

नागपूर जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असतानाच आता ‘स्क्रब टायफस’चाही शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील दोन ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गोंदियातही दोन रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे २४ तासांत जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चे नवीन २० रुग्ण आढळले.

हे देखील वाचा – नागपूर : कर्करोगग्रस्तांचा वाली कोण?, औषधांसाठी रुग्ण व नातेवाईक अधिष्ठाता कार्यालयात

मेडिकलच्या वार्डात दाखल दोन रुग्णांपैकी एक रुग्ण हा कळमेश्वर आणि दुसरा रुग्ण हा नरखेड येथील आहे. दोघांवर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून पूणेच्या आरोग्य विभागाला दिलेल्या माहितीनुसार तेथे दोन रुग्णाची नोंद झाली. त्यातील एक रुग्ण गोंदिया जिल्ह्यातील तर दुसरा बालाघाट येथील आहे. दरम्यान, करोनाचा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’चे रुग्ण आढळत नसतांनाच अचानक पून्हा हे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

११ ‘स्वाईन फ्लू’ग्रस्त रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर –

दरम्यान, २४ तासांत नागपुरातील शहरी भागात ११, शहराबाहेरील ९ असे एकूण २० नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंत आढळलेल्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १८४, शहराबाहेरील १४३ अशी एकूण ३२७ रुग्णांवर पोहचली आहे. तर एकूण रुग्णांपैकी शहरातील ११६ आणि ग्रामीणचे ७५ असे एकूण १९१ जण बरे होऊन घरी परतले आहे. तर सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये या आजाराचे ११६ रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यातील शहरात ४, ग्रामीणचे ७ असे एकूण ११ अत्यवस्थ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत.

३७८ करोनाबाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत –

नागपुरात सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस प्रत्येकी दोन करोनाग्रस्ताच्या मृत्यूने आरोग्य विभागाची चिंता वाढली असतानाच बुधवारी एकही रुग्णाचा मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे, तर २४ तासांत शहरात २४, ग्रामीणला १६ असे एकूण ४० नवीन करोनाग्रस्त आढळले. तर दिवसभरात शहरात ३३, ग्रामीणला ५ असे एकूण ३८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी शहरात २८९, ग्रामीणला १२५ असे एकूण ४१४ सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. त्यातील ३६ रुग्ण विविध शासकीय व खासगी रुग्णालयात तर ३७८ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या