हिवाळी परीक्षा सत्रापासून लागू

नागपूर : संलग्नित महाविद्यालय आणि प्राचार्य फोरमच्या विरोधानंतरही परीक्षेच्या ‘सम-विषम’ पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शिक्कामोर्बत केले आहे. विधिसभेने ‘सम-विषम’ परीक्षेवर विरोध केल्यानंतर तसा प्रस्ताव विद्वत परिषदेकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आला होता. मात्र, विद्वत परिषदेने विरोध झुगारून ‘सम-विषम’ पद्धती लागू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या सत्रांत परीक्षांपासून परीक्षेसाठी ‘सम-विषम’ पद्धतच लागू होणार हे निश्चित.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सत्रांत पद्धती लागू केली. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ  झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांना विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. दोन वर्षांपासून करोनामुळे परीक्षा विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाने त्याबाबतता प्रस्ताव तयार करीत, पहिले, तिसरे, पाचवे आणि सातवे अशा ‘विषम सत्रा’च्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेण्याचे ठरविले.

याशिवाय दुसरे, चौथे, सहावे आणि आठव्या सत्राची परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. व्यवस्थापन परिषदेने या पद्धतीने मान्यता दिली असली तरी नुकत्याच झालेल्या विधिसभेच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ सदस्य डॉ.बबनराव तायवाडे यांच्यासह प्राचार्यानी ‘सम-विषम’ परीक्षा पद्धतीला कडाडून विरोध केला. या सूचनांवर विचार करण्यासाठी या प्रस्तावास पुन्हा विद्वत परिषदेमध्ये पाठविण्याची मागणी केली. मात्र, मंगळवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत या सूचनांचा विचारही न करता, त्या पुन्हा एकदा मान्यता देण्यात आली. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये ‘सम-विषम’ पद्धतीच लागू होणार हे आता निश्चित झाले आहे.

महाविद्यालयाच्या आर्थिक बाबीवर तिढा

विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांप्रमाणे महाविद्यालयस्तरावर परीक्षा घ्यावयाची आहे. ती परीक्षा घेताना, पेपर सेटिंग, पेपर, उत्तरपत्रिकांची छपाई, त्यासाठी बाहेरील प्राध्यापकांना बोलवावे लागणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क वसुली करतील. दुसरीकडे सध्या ऑनलाईन परीक्षा असल्याने महाविद्यालयांना अशाप्रकारे परीक्षा घेणे शक्य होईल. मात्र, त्यानंतर महाविद्यालये पुन्हा याला विरोध करण्याची चिन्हे आहेत.