गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीवांच्या अधिवासात वाढ करण्याकरिता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव राष्ट्रीय उद्यानात चितळ स्थानांतरण कार्यवाहीचा दुसरा टप्पाही २ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या पार पाडला. पहिल्या टप्प्यात ७३ आणि दुसऱ्या टप्प्यात ३४ असे एकूण १०७ चितळ यशस्वीरीत्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले . या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे दरम्यान एकाही चितळाला इजा झाली नाही. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून, त्यांना पकडण्याच्या प्रक्रिये दरम्यान मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी होणाऱ्या तीव्र ताणामुळे त्याचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रक्रिया थोडी जोखमीची सुद्धा असते. परंतु, यावेळी करण्यात आलेल्या स्थानांतरणात एकाही प्राण्याचा मृत्यू झाला नाही.
ही संपूर्ण मोहीम नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचे क्षेत्र संचालक पीयूषा जगताप, क्षेत्र उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, विभागीय वनाधिकारी अतुल देवकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडली. मोहिमेला नवेगाव राष्ट्रीय उद्यान वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनय जगदाने, कोसबी क्षेत्र सहायक आय. झेड. शेख, वनरक्षक आर. एम. झोडे, वनरक्षक एच. एम. परिहार, राष्ट्रीय उद्यानातील वनरक्षक व क्षेत्रीय कर्मचारी हजर होते. नवेगाव-नागझिरा व ताडोबा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट समन्वयामुळे ही स्थानांतर प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व यशस्वीरीत्या पार पडली. याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
व्याघ्रसंवर्धन व मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात चितळांची संख्या अधिक आहे. तर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ती त्या प्रमाणात कमी आहे. चितळ हे वाघांचे खाद्य आहे. वाघांना जंगलातच पुरेसे खाद्य मिळाले तर गावाच्या दिशेने धाव घेणार नाहीत. यामुळे मानव व वन्यजीव संघर्षसुद्धा निर्माण होणार नाही. यासाठीच कुरण क्षेत्रात चितळांना निसर्गमुक्त करण्याचा प्रयोग वन्यजीव विभागाच्या वतीने राबविला जात आहे.
गेल्या २०२५ वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून गोंदिया जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अधिकच वाढला आहे. गेल्या जानेवारी २०२६ महिन्यात गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यात एक तीन वर्षीय चिमुकला आणि नुकतीच एक महिला यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात पुढील काळात काही प्रमाणात कमतरता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
” चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नवेगाव राष्ट्रीय उद्यानात चितळ स्थानांतरण प्रक्रिये दरम्यान एकूण १०७ चितळ नवेगाव राष्ट्रीय उद्यानात स्थानांतरण करण्यात आले आहे.” – पीयूषा जगताप, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया

