आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याचा दुराग्रह

आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्कूलबसवर जप्तीची कारवाई करताना त्यातील विद्यार्थ्यांना आधी घरी सोडावे व नंतरच वाहन निश्चित ठिकाणी जमा करावे, अशा सूचना आहेत. परंतु बुधवारी एका अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांसह स्कूलव्हॅनसह आरटीओ कार्यालयात आणून विद्यार्थ्यांना वेठीस धरले. सर्व मुले रडत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. ही गंभीर बाब एका अधिकाऱ्याच्या निदर्शनात येताच त्याच्या सूचनेवरून या मुलांना घरी सोडण्यात आले. आरटीओ कार्यालयातील या अधिकाऱ्याचा दुराग्रहाविरुद्ध पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना नियम मोडणाऱ्या स्कूलबस आणि स्कूलव्हॅनच्या विरोधात कारवाई करण्याच्या परिवहन कार्यालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार नागपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागातही कारवाई सुरू आहे. बुधवारी शहर आरटीओ कार्यालयातील वासुदेव मुगल या मोटार वाहन निरीक्षकाने भवन्स, सिव्हिल लाईन्स येथील विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एमएच- ३१, डीएस- ५१९७ क्रमांकाच्या स्कूलव्हॅनची दुपारी तीन- साडेतीनच्या सुमारास तपासणी केली. त्यात बऱ्याच नियमांना बगल दिल्याचे निदर्शनात आले. वाहन जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ते जप्त करण्यापूर्वी त्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवून देणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत मुगल यांनी स्कूलव्हॅन विद्यार्थ्यांसह आरटीओ कार्यालयात आणली.

घरी जायला विलंब होत असल्याने वाहनातील लहान मुले रडू लागली. वाहन चालकाने वाहनाच्या कागदपत्रासह त्याचा परवाना देत मुलांना सोडून लगेच परत येत असल्याचे अधिकाऱ्याला सांगितले. परंतु अधिकाऱ्याने न एकता मुलाला दुसऱ्या वाहनातून सोडण्याचा हट्ट धरत त्यांना ताटकळत ठेवले. ही माहिती उपस्थितांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना दिली.

आदे यांनी तातडीने मुगल यांना त्या वाहनात बसून विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी सोडल्यावर कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर विद्यार्थी घरी पोहचले.

‘‘संबंधित अधिकाऱ्याच्या माहितीनुसार स्कूलबस चालकाने दुसऱ्या वाहनातून विद्यार्थ्यांना घरी सोडणार असल्याचे सांगितल्यावर विद्यार्थ्यांना कार्यालयात आणले गेले. परंतु प्रकरणाचे गांभीर्य बघत त्याची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. पुढे हा प्रकार होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल.’’

– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)