चंद्रपूर: स्वयंघोषित पंतप्रधान महादेव गुलाबराव आसेकर शनिवारी सायंकाळी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. वरोरा येथील रत्नमाला चौकात पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट्स तोडून स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीने स्वयंघोषित पंतप्रधान पसार झाल्याने वरोरा येथे चांगलीच चर्चा रंगली आहे.
वरोरा येथील रहिवासी असलेल्या महादेव गुलाबराव आसेकर यांनी स्वतःच्या गाडीवर स्वयंघोषित पंतप्रधान असे लिहिले आहे. त्यानंतर महादेव आशेवर यांनी पोलिस आयुक्त यांच्याकडे एका निवेदनातून बंदुकीची मागणी केली. तसेच बंदूक स्वतः घरी आणून द्यावी असही पत्रात नमूद केले होता.
तेव्हापासून हा स्वयंघोषित पंतप्रधान चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच शनिवारी सायंकाळी पोलिस या स्वयंघोषित पंतप्रधानांच्या मार्गावर होते. यावेळी रत्नमाला चौकात गाडी अडविण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट लावले होते. मात्र स्वयंघोषित पंतप्रधान रत्नमाला चौकातून फॉर्च्युनर गाडी (एम. एच.३४-९२१५) ने जात असताना लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता बॅरिकेट तोडून तिथून चारचाकी वाहनाने पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्यानंतर रत्नमाला चौकातून वाहन जवळपास चार ते पाच किलोमीटर दूर आल्यानंतर महादेव गुलाबराव आसेकर गाडीतून खाली उतरले आणि तिथून पसार झाले.
दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. पोलिस या स्वयंघोषित पंतप्रधानांच्या मार्गावर आहेत. महादेव गुलाबराव आसेकर यांच्या वाहनावर अजूनही पंतप्रधान (PM) भारत सरकार असे लिहिलेले आहे. वरोरा पोलिस महादेव आसेकर यांचा शोध घेत आहेत.
