नागपूर : शहरातील सुप्रसिद्ध मेंदू व मज्जासंस्था शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने नागपूरसह विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसेवा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि अचूक शल्यचिकित्सा यासाठी ओळख असलेले डॉ. पाखमोडे यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेतले. मेडिकलमधूनच त्यांनी सामान्य शस्त्रक्रियेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि पुढे मुंबई येथील नामांकित वैद्यकीय संस्थेतून मेंदू व मज्जासंस्था शल्यचिकित्सेतील उच्च विशेष पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नागपूरमध्येच कार्यरत राहून मेंदूशी संबंधित गंभीर व गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार केले. मेंदूतील गाठी, मेंदूतील रक्तस्राव, अपघातानंतर होणाऱ्या डोक्याच्या जखमा तसेच मज्जासंस्थेचे विविध आजार यांवर शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून त्यांनी असंख्य रुग्णांना नवजीवन दिले.
वैद्यकीय सहकारी आणि रुग्णांमध्ये ते शांत स्वभाव, स्पष्ट मार्गदर्शन आणि संवेदनशील उपचारपद्धतीसाठी परिचित होते. नागपूरमधील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये त्यांनी सल्लागार शल्यचिकित्सक म्हणून सेवा दिली. केवळ शस्त्रक्रियेतच नव्हे, तर तरुण डॉक्टरांना मार्गदर्शन करणे, वैद्यकीय शिस्तीचे महत्त्व पटवून देणे आणि रुग्णांच्या मानसिक आधारासाठी वेळ देणे, यासाठीही ते ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, सामाजिक संस्था, माजी रुग्ण आणि नागपूरकरांनी हळहळ व्यक्त केली. अनेक रुग्णांनी ‘जीवनदान करणारा डॉक्टर हरपला’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नीसह मोठा आप्त परिवार आहे. डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे कार्य आणि रुग्णसेवेसाठी दिलेले योगदान नागपूरच्या वैद्यकीय इतिहासात कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?
नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. २५ वर्षांहून अधिक काळ दिलेल्या आपल्या वैद्यकीय सेवेत डॉ. पाखमोडे यांनी असंख्य रुग्णांना नवजीवन दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. एक कुशल शल्यचिकित्सक असण्याबरोबरच अत्यंत शांत, सुस्वभावी आणि रुग्णांना आपुलकीने वागवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
