महिला रुग्णाची मेयोसह खासगी रुग्णालयातही उपेक्षा

महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

इंजेक्शन नसल्याचे सांगत मेडिकलला पाठवले

नागपूर :  वाडी परिसरात राहणाऱ्या एका  महिलेची मेयोसह खासगी रुग्णालयातही उपेक्षा करण्यात आली. डिगडोह येथील खासगी रुग्णालयात इंजेक्शन नसल्याचे सांगत तर  मेयो रुग्णालयाने त्वचारोग तज्ज्ञ नसल्याचे सांगत तिला मेडिकलला पाठवले. मेयोतील अनेक रुग्ण मेडिकललाच पाठवले जात असल्याने तेथे नेमक्या कोणत्या रुग्णांवर उपचार होतात, असा  प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

बबिता (बदललेले नाव)चे  तिचे पती ट्रांसपोर्टचा व्यवसाय करतात. बबिताची प्रकृती खालावल्यावर  तिला प्रथम नातेवाईकांनी डिगडोह येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे  तिच्यात गुप्तरोगाचे जिवाणू असल्याचा प्रकार पुढे आला. हा आजार बरा होतो.

त्यासाठी रुग्णाला पेनेसिलीन  इंजेक्शनची गरज असते. ते खासगी रुग्णालयात नसल्याचे कळवण्यात आल्यावर तिला ७ ऑक्टोबरला  मेयो रुग्णालयात पाठवले गेले. येथे तिला  विभागप्रमुखांना भेटायला सांगण्यात आले. त्वचारोग विभागाचा तज्ज्ञ नसल्याचे सांगत मेयोला जाण्याचा सल्ला दिला गेला.  मेयो रुग्णालयात दाखलही केले जात नसल्याने ती महिला  पतीसह मेडिकल रुग्णालयात आली. येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात तिने उपस्थित अधिकाऱ्यांना तिला आलेला वाईट अनुभव सांगितला. अधिकाऱ्यांनी महिलेला पूर्ण मदतीसह उपचाराचे आश्वासन देत १४ ऑक्टोबरला मेडिकल रुग्णालयात दाखल होण्यासाठी बोलावले. त्यामुळे महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

दरम्यान, मेयो रुग्णालयातून  सातत्याने मेडिकल रुग्णालयात दाखल होण्यासाठी येणारे रुग्ण वाढले आहेत. मेयो रुग्णालयातील सर्जिकल कॉम्प्लेक्समधील कोविड रुग्णालय बंद करत येथे गैरकरोनाच्या रुग्णांवर उपचार होत असल्याचा दावा केला जात आहे. परंतु येथून  रुग्णांना दाखल न करता मेडिकलला पाठवले जात असल्याने मेयो रुग्णालयातील डॉक्टर करतात काय,  हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सोबत येथे त्वचारोग तज्ज्ञ नसल्यास मेडिकलमधून ऑन कॉल डॉक्टरांना का बोलावले जात नाही, हाही प्रश्न कायम आहे.  या विषयावर मेयोच्या अधिष्ठात्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sent medical saying there was no injection female patient was also neglected private hospital including mayo hospital akp