बुलढाणा : तृतीयपंथी आधीपासूनच समाज व्यवस्थेतही उपेक्षित घटक ठरला आहे. या घटकांना समाजाकडून आजही हेटाळणी, उपेक्षा, तुच्छ वागणूक, उपमर्द, जाहीर अवमान याशिवाय काही भेटत नाही. सार्वजनिक स्थळी वावरताना त्यांची मोठी अडचण होते. नैसर्गिक विधीसाठी त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांची मोठी कुचंबणा होते.

ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता एक स्तुत्य व अनुकरणीय निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील एसटी बस आगार, महत्वाच्या बस स्थानकावर तृतीय पंथीयासाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे (स्वच्छतागृह ) बांधण्यात येणार आहे. बस स्थानकासह सार्वजनिक स्थळी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालयात सुद्धा अशीच सुविधा आहे. मात्र, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.

एरवी टीकेचे धनी ठरणाऱ्या राज्य परिवहन मंडळाने प्रथमच स्वच्छतेचे आणि लैंगिक समानतेचे एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापनाने सर्व विभागातील (जिल्ह्यातील) विभागीय अभियंता (स्थापत्य) यांना या संदर्भातील निर्देश दिले होते. प्रसाधनगृहासंदर्भात अंदाजपत्रके तयार करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले. तृतीयपंथीयासाठी बांधण्यात येणारी ही प्रसाधन गृह ६ स्क्वेअर मिटर ६२ स्क्वेअर फूट ) इतक्या आकाराची राहणार आहे. ही प्रसाधनगृह बांधून झाल्यावर या उपेक्षित घटकाची गैरसोय दूर होणार आहे.

बुलढाण्यात १४ स्थानकांचे नियोजन

बुलढाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास जास्त प्रवासी वाहतूक व बस फेऱ्या असणाऱ्या १४ बस आगार व स्थानकात प्रसाधन गृह राहणार आहे. विभागीय अभियंता ( स्थापत्य) अजय नाईक यांनी विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली १४ प्रसाधान गृहाची अंदाज पत्रके तयार करून मुख्यालयाला पाठविली आहे. जिल्ह्यात बुलढाणा, शेगाव, मलकापूर, मेहकर, चिखली, खामगाव, जळगाव जामोद या आगारासह सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मोताळा, नांदुरा, धाड, अमडापूर स्थानकात ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.