नागपूर : ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी तूट नोंदवल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस

सप्टेंबर महिन्यात देशातील पावसाची दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर-पश्चिम, ईशान्य, पूर्व आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागांत तसेच दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातील काही तुरळक भागांत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरात पावसाचे वितरण असमान राहण्याचे संकेत आहेत.

पहिल्या आठवड्यातही तुटीचा अंदाज

सप्टेंबरच्या सुरुवातीला पावसाची स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसल्याचे विस्तारित अंदाजातून स्पष्ट होते. २ सप्टेंबरपर्यंत हिमालयाच्या पायथ्यालगतचा भाग, पूर्व-मध्य भारतात सरासरी ते अधिक पाऊस, तर द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. देशाचा एकूण पाऊस या कालावधीतही सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. ३ ते ९ सप्टेंबरदरम्यान पूर्व भारत आणि लगतच्या पूर्व-मध्य भारतात सरासरी ते अधिक पावसाची शक्यता असून, देशाच्या उर्वरित भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उष्णतेपासूनही दिलासा कमीच

पावसाबरोबरच सप्टेंबरमध्ये तापमानही अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. उत्तर-पश्चिम, पश्चिम-मध्य आणि ईशान्य भारताच्या काही भागांत मात्र किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहू शकते.

ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट

दरम्यान, ऑगस्टमध्ये देशभरातील पावसाचे प्रमाण २१३.३ मिलिमीटर नोंदले गेले. १९०१ नंतरचा हा ऑगस्टमधील १७वा सर्वात कमी पाऊस असून, २००१ नंतरचा सातवा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. यामुळे सप्टेंबरच्या पावसाच्या अंदाजाकडे विशेष लक्ष लागले आहे. मोसमी पावसाच्या ३१ ऑगस्टपर्यंतच्या स्थितीत देशातील ७४१ जिल्ह्यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यापैकी ३१२ जिल्ह्यांत पाऊस सरासरीपेक्षा कमी, तर ३८ जिल्ह्यांत मोठी तूट नोंदवण्यात आली. २९० जिल्ह्यांत पाऊस सरासरी होता.