वर्धा : सत्याचे प्रयोग जगाला शिकविणारी पुण्यभू म्हणून सेवाग्रामची ओळख दिल्या जाते. महात्मा गांधी व अन्य तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांची वर्दळ व विविध घडामोडीमुळे स्वातंत्र्यपूर्व भारताची राजधानी म्हणून सेवाग्रामचे इतिहासात स्थान कोरले गेले आहे. आता याच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने नव्या पिढीस गांधी सूत्र सांगण्यासाठी एक उपक्रम सूरू केला आहे. सेवाग्राम फेलोशिप म्हणून अध्ययनपर असा हा उपक्रम राहणार.
त्यादाठी गांधी विचारासंबंधी कोणते अध्ययन किंवा प्रयोग करू इच्छिता यासंबंधी टिपण सादर करायचे आहे. या टिपणात इच्छुकास कामाचा उद्देश, त्याची पद्धती आणि अपेक्षित फलित लिहावे लागेल. हे टिपण कमाल पंधराशे शब्दापर्यंत असावे. सेवाग्राम आश्रमामध्ये दरवर्षी दोन फेलो निवडले जातील. निवड समितीमध्ये विविध विषयांच्या तज्ज्ञांचा समावेश असेल.
आपल्या टिपणाच्या आधारावर निवड समिती आपली मुलाखत घेईल आणि त्यातून दरवर्षी दोन उमेदवारांची फेलोशिप साठी निवड केली जाईल.गांधी विचारांच्या अध्ययनासाठी अ)आपल्या संस्थेची लायब्ररी तसेच जवळच्या गांधी सेवा संघाच्या लायब्ररीची सुविधा उपलब्ध आहे. ब) आपल्याला शेतीमध्ये प्रयोग करायचे असल्यास प्रयोगासाठी दोन एकर जमीन आश्रम उपलब्ध करून देणार. तसेच शेतीला लागणारे वाजवी अर्थसहाय्य देण्यात येईल. क) खादीमध्ये प्रयोग करायचे असल्यास आश्रमाच्या अंबर चरखा केंद्राचे सहाय्य मिळेल. ड) ग्रामोद्योगांमध्ये नवीन प्रयोग करायचे असल्यास मानवी मदत आणि वाजवी अर्थसहाय्य मिळू शकेल.
यासाठी फेलोशिप चा कालावधी एक वर्ष राहील. तसेच मानधन दरमहिना रुपये दहा हजार मानधन देण्यात येईल. सेवाग्राम आश्रमात निवास आणि भोजन व्यवस्था मोफत होईल.फेलोशिपच्या कालावधीत आश्रमामध्ये राहत असताना आपल्या आश्रमाचे सर्वसाधारण नियम पाळावे लागतील. त्याचबरोबर आश्रमामध्ये दररोज एक तास श्रमदान करावे लागेल.प्रार्थनेसाठी हजेरी आवश्यक राहील. खादी वापरणे अपेक्षित आहे. वेळप्रसंगी आश्रमाच्या कामात मदत करावी लागेल.निवड झालेल्या फेलोनी दर दोन महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल आश्रमाला सादर करायचा आहे.
सहाव्या महिन्यात आणि वर्षाच्या शेवटी तज्ञ मंडळी फेलोंसोबत सोबत त्यांच्या कामासंबंधी चर्चा करतील. मधल्या काळात फेलोना तज्ञांचे सहाय्य लागल्यास उपलब्ध करून देण्यात .
यासाठी ठराविक नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे.
नाव , पत्ता, ईमेल संपर्काचा फोन नंबर अपेक्षित. अडचणीच्या वेळी मदतीला येणाऱ्या जवळच्या व्यक्तीचे नाव,पत्ता व फोन नंबर द्यायचा आहे.राष्ट्रीयत्व भारतीय असल्यास आधार कार्ड नंबर/ परदेशी व्यक्ती असल्यास नियमांप्रमाणे लागणारी सर्व कागदपत्रे .त्याचबरोबर एका भारतीयाचा संपर्क पत्ता आणि फोन नंबर द्यावा लागणार.समाजकार्याचा अनुभव,आवडणारी पुस्तके, विशेष कौशल्य नमूद करायचे आहे.आपल्या भागातील दोन गांधीवादी/ प्रागतिक व्यक्तींचे शिफारस लागणार. त्यात नाव, पत्ता, फोन नंबर, संघटनेचे नाव व शिफारस मजकूर द्यायचा आहे.
आपल्या टिपणासहीत उपरोक्त अर्ज वरील पत्त्यावर किंवा सेवाग्राम आश्रम @ याहू डॉट इन किंवा ९२७००६३८६९ या व्हॉट्स अँप नंबरवर वर्ड फाईल मध्ये पाठवावा, अशी सूचना सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा व सचिव विजय तांबे यांनी केली आहे.