बुलढाणा : मागील पंचावन्न वर्षांची वारीची वैभवशाली परंपरा कायम ठेवत शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीने आज आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. गुरुवार (दिनांक १३) च्या मुहूर्तावर रवाना झालेल्या या वारीत सातशे भाविक सहभागी झाले आहे. ‘गण गण गणात बोते’च्या गजराने यावेळी संस्थान परिसर गुंजला.

मागील काही दिवसांत पालखीच्या नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थानकडून पूर्ण करण्यात आली. यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्षे असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले. सातशे वारकरी, अडीचशे पताकाधारी, अडीचशे टाळकरी आणि दोनशे सेवेकरी असा पालखीचा थाट आहे. आज गुरुवारी सकाळी संत गजानन महाराज संस्थान परिसरातून मंत्रोच्चारात विधिवत पूजन आणि अन्य विधी झाल्यावर श्रींची पालखी मार्गस्थ झाली. गण गण गणात बोते.. जय गजानन श्री गजानन.. विविध अभंगांच्या निनादात श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.

हेही वाचा – “लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना सुपारी देण्याचा प्रयत्न,” प्रतिभा धानोरकर यांचा आरोप

संस्थानचे विश्वस्त, कर्मचारी, सेवेकरी यांच्यासह जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या साक्षीने संतनगरीच्या वेशीकडे रवाना झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्रीपदाचा नुकतेच पदभार स्वीकारलेले प्रतापराव जाधव हे देखील पालखीला निरोप देण्यासाठी हजर होते. संत गजानन महाराज संस्थान मंदिर ते संत नगरीच्या वेशीपर्यंत हजारो आबालवृद्ध भाविक पालखीत सहभागी झाले. आज मध्यान्ही ही पालखी गोमाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत श्रीक्षेत्र नागझरी येथे महाप्रसादसाठी विसावली. यानंतर पुढे कूच करणारी महाराजांची पालखी संध्याकाळी अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. आज पालखीचा मुक्काम पारस ईथे आहे.

पंधरा जुलैला पंढरपुरात

पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहे. यंदा आषाढी एकादशी १७ जुलैला आहे. या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो. त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. पालखीचे यंदा ५५ वे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटोपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारत भरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात.

हेही वाचा – सावधान… राज्यातील अनेक वीज निर्मिती संच बंद! झाले असे की…

पालखीचा प्रवास असा…

१३ जुन रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. १४ जुन रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भौरद येथे मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे १५ व १६ जुन असे दोन दिवस मुक्काम राहील. १७ जुन रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, १८ जुन रोजी देऊळगाव (बाभूळगाव)-पातूर, १९ जुन मेडशी-श्री क्षेत्र डव्हा, २० जुन मालेगाव- शिरपूर जैन, २१ जुन चिंचापा पेन-म्हसला पेन, २२ जुन किनखेडा-रिसोड. यानंतर पालखी मराठवाड्यात प्रवेशनार आहे.

२३ जून पान कन्हेरगाव-सेनगाव, २४ जुन श्री क्षेत्र नरसी (नामदेव) – डिग्रस, २५ जून श्री क्षेत्र औंढा नागनाथ-जवळा बाजार, २६ जुन हट्टा (अडगांव रंजोबा) श्री क्षेत्र त्रिधारा, २७ जुन परभणी- परभणी, २८ जून ब्राह्मणगाव दैठणा, २९ जुन खळी – गंगाखेड, ३० जुन वडगाव (दादा हरी) परळी (थर्मल). १ जुलै परळी- परळी वैजनाथ, २ जुलै कन्हेरवाडी- अंबाजोगाई, ३ जुलै लोखंडी सावरगाव – बोरी/सावरगाव, ४ जुलै गोटेगाव – कळंब, ५ जुलै गोविंदपूर – तेरणा साखर कारखाना, ६ जुलै किनी – उपळा (माकडाचे), ७ जुलै शसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (धाराशिव) धाराशिव, ८ जुलै वडगाव सिद्धेश्वर-श्री क्षेत्र तुळजापूर, ९ जुलै सांगवी ऊळे, १० जुलै सोलापूर सोलापूर, ११ जुलै सोलापूर – सोलापूर, १२ जुलै सोलापूर तिन्हे. १३ जुलै कामती खु. (वाघोली) माचनूर, १४ जुलै ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा, १५ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी डेरेदाखल होणार आहे.