लोकसत्ता टीम

नागपूर : भांडेवाडीमध्ये प्राण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या दफनभूमीत गेल्या तीन वर्षात १७०९ जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, त्यात १३४० गायींचा समावेश आहे. मात्र या ठिकाणी प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युत वाहिनीचा मार्ग अजनूही मोकळा झालेला नाही. याबाबतचा प्रस्ताव कागदावरच आहे. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी प्राण्याच्या दफनभूमी विषयी माहिती मागितली होती. घरात मांजर, श्वान, पोपट, ससे, उंट, गाय, सांड, घोडा, शेळी, खारींसारखे प्राणी अनेक जण पाळतात. पण, अशा लाडक्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न कायमच असतो. भांडेवाडीमध्ये ही सोय आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात येथे १७०९ प्राण्यांचे दफनविधी करण्यात आले. परंतु, प्राण्यांच्या दफनभूमीमुळे तेथे प्रदूषण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने प्राण्याच्या अंत्यसंस्करासाठी विद्युत दाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. मात्र तो अजूनही कागदावरच आहे. या ठिकाणी विद्युत दाहिनी नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खड्डा खोदून आपल्या आवडत्या प्राण्याचे दफन करावे लागत आहे.

आणखी वाचा-‘आधी लगीन कोंढाण्याचे…’ भारताच्या वर्ल्डकप फायनलसाठी युवानेते सुजात आंबेडकरांनी रद्द केली शिक्षण हक्क परिषद

२०२१ मध्ये ८२१ , २०२२ मध्ये ५२० आणि २०२३ मध्ये ३६८ प्राण्यांचे याठिकाणी दफन करण्यात आले. १७०९ मध्ये १३४० गायींचा, २८३ श्वानांचा समावेश आहे. या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीचा वापर करून प्राण्यांचे दफन केले जाते. त्यासाठी खड्डा खणला जातो. त्यात मृतदेह ठेवण्यात आल्यानंतर जाडे मीठ, पेस्टीसाइड पावडर, चुन्याचा थर दिला जातो. यामुळे प्राण्याच्या मृतदेहाचे लवकर विघटन होते. यासाठी कुठेही शुल्क आकारले जात नाही. येथे सकाळी ३ व दुपारी २ कर्मचारी काम करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी विद्युत दाहिनीचा प्रस्ताव असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. -डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी, महापालिका.