नागपूर : आरोग्य विभागाच्या २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षांबाबत राज्यभर गोंधळ उडाल्यानंतर आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी अर्ज केलेल्या विभागातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र दिल्याचा खुलासा केला. मात्र, यानंतरही परीक्षा केंद्रांचा वाद संपलेला नसून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी अनेक संघटनांकडून केली जात आहे.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यापूर्वी ही परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर पुन्हा ‘न्यासा’ कंपनीद्वारेच २४ आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र  दिल्यानंतर नवा गोंधळ समोर आला. उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्यातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्यातील केंद्र दिल्याचे समोर आले. या गोंधळानंतर रविवारी आरोग्य सेवा संचालक डॉ. पाटील यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र देण्यात आल्याची माहिती दिली. परीक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे. उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन सत्रात परीक्षा केंद्र देण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही परीक्षा केंद्र वेगवेगळ्या जिल्ह्यात दिल्याच्या तक्रारी कायमच आहेत. त्यामुळे ही परीक्षा त्वरित रद्द करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीसह अन्य संघटनांनी केली आहे.

पत्ताच चुकीचा

एका ओळखपत्रावर उमेदवाराने अकोला विभागात अर्ज केला. मात्र त्याला सकाळच्या पेपरसाठी अकोला तर दुपारच्या पेपरसाठी बुलढाणा केंद्र देण्यात आले आहे. एका उमेदवाराचा पत्ता हा मीरा भाईंदरचा आहे. पण ओळखपत्रावर भांडूप ईस्ट छापून आले आहे.

आरोग्य भरतीत प्रवेशपत्रांचा घोळ रोज नव्याने समोर येत आहे. सरकारने नियुक्त केलेली कंपनी परीक्षेसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही. सरकारने वेळेवर परीक्षा रद्द करण्याऐवजी ती आताच रद्द करून एमपीएससीमार्फत परीक्षा घ्यावी.

– नीलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती.