नागपूर : शहराचा वाढता विस्तार बघता हुडकेश्वर, नरसाळासह आजूबाजूच्या परिसरात उद्यान, मैदान व अन्य वापरासाठी पाणी मिळावे याकरिता नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पोरा नदीला लागून २० एमएलडीचा सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने शहरातील उद्यानात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यानुसार शंकरनगर व पांडे लेआऊटमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

भांडेवाडी परिसरात  दोन वर्षांपूर्वी नागनदीवर १५० एमएलडीचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे.  हुडकेश्वर व नरसाळा हा परिसर पूर्वी कामठी मतदारसंघात होता. २०१४ मध्ये शहराचा वाढता विस्तार बघता या परिसराला महापालिकेअंतर्गत जोडण्यात आले. त्यामुळे या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. सांडपाणी शुद्धीकरण साखळीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने स्मार्ट सिटीने हुडकेश्वर नरसाळा परिसरातील उद्यान, मैदान व अन्य कामांसाठी पाणी मिळावे यासाठी हा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले असून या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.