यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेत भाजपला नगराध्यक्ष पदासह एकहाती बहुमत मिळाले. मात्र भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसपा आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन नगर परिषदेचा कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आघाडीचे गटनेते म्हणून भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक नितीन गिरी यांची निवड करण्यात आली आहे.
नगरपरिषदेत भाजपकडे नगराध्यक्षासह सर्वाधिक २८ नगरसेवक असे २९ चे संख्याबळ आहे. आता आघाडीमध्ये प्रहारचे दोन सदस्य, बसपा आणि अपक्ष प्रत्येकी एक असे चार सदस्यांचे समर्थन घेऊन आघाडी तयार झाली आहे. काँग्रेसकडे १५ नगरसेवक आहेत. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना(शिंदे)कडे सात नगरसेवक आहेत. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे तीन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. आता सत्ताधारी ३२ नगरसेवक विरुद्ध २६ असे संख्याबळ निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष भाजपचा असल्याने भाजपलाच त्यांचे मत मिळणार आहे. त्यामुळे सभागृहातील कुठलाही ठराव ३३ विरुद्ध २६ अशा मतांनी पारित होणार आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत महायुतीतील शिवसेना(शिंदे)ने स्वतंत्र लढत दिली. निवडणुकीनंतर भाजप व शिवसेना (शिंदे) एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात सत्तेबाबतचे गणित जुळले नाही. मुळात भाजपला यवतमाळ शहरात शिवसेनेला सत्तेत भागीदारी द्यायची नाही. बिनशर्त सोबत येणाऱ्यांनाच घ्यायचे असे ठरल्याने प्रहार, बसपा व अपक्ष यांची साथ भाजपला लाभली. यातील अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली. भाजपचे शहर महामंत्री म्हणून ते कार्यरत होते. निवडणुकीनंतर ब्राह्मणकर भाजपसोबतच जाणार हे स्पष्ट होते. आता ३३ चे संख्याबळ असल्याने भाजपला निर्णय प्रक्रियेत कुठेही अडथळा येणार नाही, अशी स्थिती आहे.
भाजप जिल्हा कार्यालयात सोमवारी दुपारी यवतमाळ शहर विकास आघाडी व गटनेता निवडीची प्रक्रिया झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चव्हाण, नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, महामंत्री राजू पडगीलवार, योगेश पाटील, शंतनू शेटे, रेखा कोठेकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व आघाडीतील नगरसेवक उपस्थित होते. नगरपरिषदेतील पहिली सभा व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम शासन स्तरावरून प्राप्त झालेला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन मागविले आहे. यावर अद्याप कुठलीही सूचना मिळाली नाही. नगरपरिषदेतील राजकीय पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी गट, आघाडीची नोंदणी केली जात आहे. गटनेत्यांची निवडही करण्यात येत आहे. शासन स्तरावरून मार्गदर्शन आल्यास २ जानेवारी रोजी पहिली सभा होऊ शकते. यामध्ये उपाध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्य निवडसुद्धा करण्यात येणार आहे.
‘स्वीकृत’साठी रस्सीखेच
भाजपच्या वाट्याला पाच पैकी तीन स्वीकृत सदस्य येणार आहेत. त्यामुळे आता नगरपरिषदेत जाण्यासाठी दोन पराभूतांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे पदाधिकारी असलेल्या या पराभूतांकडून स्थानिक नेत्यावर दबाव आणला जात आहे. तर उमेदवारीच्या वाटाघाटीत ज्यांनी नेत्यांच्या शब्दावरून माघार घेतली, त्यांनाही स्वीकृत सदस्य म्हणून जायचे आहे. एकूणच तीन जागेसाठी सहा इच्छुक प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसमध्येही स्वीकृतसाठी रस्सीखेच सुरू झाली. नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवाराने स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली, तर काँग्रेस आमदारांच्या निकटवर्तीयांनी ११ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन स्वीकृतसाठी प्रयत्न चालविले आहे.
