नागपूर: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ढिसाळ कारभाराविरोधात आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून होणाऱ्या आरोग्यास घातक पदार्थांच्या अप्रत्यक्ष जाहिरातींविरोधात ‘द प्लॅटफॉर्म’ या स्वयंसेवी संस्थेने पुकारलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. ‘द प्लॅटफॉर्म’ने दाखल केलेल्या सततच्या तक्रारी व माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या जाबामुळे, वाढलेल्या प्रशासकीय दबावापोटी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. मात्र या संदर्भातील तक्रार नागपूर आतील एक तरुणांनी दिलेली आहे. काय आहे प्रकरण पाहूया.

कायदेशीर लढा, तक्रार आणि आरटीआयचा दणका

‘द प्लॅटफॉर्म’ संस्थेकडून ऑक्टोबर २०२१ पासून सातत्याने अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध शासकीय प्राधिकरणांकडे तंबाखूजन्य व पान मसाला कंपन्यांसह संबंधित सेलिब्रिटींवर कठोर कारवाई करण्यासाठी औपचारिक तक्रारी सादर करून पाठपुरावा केला जात होता. परंतु, दीर्घकाळ उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी किंवा दृष्टीस पडणारी कारवाई करण्यात आली नाही.

प्रशासनाच्या या उदासीनतेवर बोट ठेवण्यासाठी ‘द प्लॅटफॉर्म’ने अन्न व औषध प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला. या अर्ज आणि तक्रारींच्या माध्यमातून प्रशासनाला थेट विचारणा करण्यात आली की, ऑक्टोबर २०२१ पासून दाखल केलेल्या तक्रारींवर विभागाकडून नक्की काय पावले उचलली गेली आणि दोषींवर काय कारवाई झाली? या तक्रार व आरटीआय अर्जांच्या दणक्यामुळे एफडीए प्रशासनात खळबळ उडाली आणि अखेर प्रशासनाला प्रत्यक्ष कारवाईचे पाऊल उचलावे लागले.

एफडीएची कडक कारवाई व अभिनेत्यांना निर्देश

महाराष्ट्रात गुटखा, निकोटीन आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी आहे. मात्र, ‘विमल’सारख्या प्रस्थापित पान मसाला ब्रँडची ‘इलायची’च्या नावाखाली सरोगेट (अप्रत्यक्ष) जाहिरात करून कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष एफडीएने काढला आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील कलम २४ आणि ५३ (दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरील बंदी) अन्वये बजावलेल्या नोटीसमध्ये एफडीएने खालील कडक निर्देश दिले आहेत.

जाहिरातींवर त्वरित बंदी

तिन्ही अभिनेत्यांनी विमल इलायचीच्या जाहिरातींमधील आपला सहभाग तात्काळ थांबवावा. डिजिटल कंटेंन्ट हटवणे: आपापल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून या जाहिरातीचे सर्व प्रचार साहित्य १५ दिवसांच्या आत हटवण्यात यावे. १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण:जाहिरातीचा करार, पूर्व-तपासणी आणि विमल इलायची हे खरोखरच स्वतंत्र उत्पादन आहे का, यावर १५ दिवसांत रीतसर स्पष्टीकरण सादर करावे.

या संपूर्ण कारवाईवर आणि सामाजिक

जबाबदारीवर आपली रोखठोक भूमिका मांडताना ॲड. राजीव खोब्रागडे म्हणाले, सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, २००३ च्या कलम ५ नुसार तंबाखूजन्य उत्पादनांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरातींवर पूर्णपणे बंदी आहे. सेलिब्रिटींना फॉलो करणाऱ्या करोडो तरुण पिढीवर व नागरिकांवर या जाहिरातींचा थेट प्रभाव पडतो. त्यामुळे अशा आरोग्यास घातक उत्पादनांच्या जाहिरातींपासून सेलिब्रिटींनी पूर्णपणे दूर राहिले पाहिजे.