चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर वर्धा येथील उद्योजक शैलेश अग्रवाल यांच्या नावावर उमेदवारी निश्चित केली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतल्याने उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीनंतर एकमेकांपासून काहीसे दूर राहिलेल्या काँग्रेस नेत्यांनी शनिवारी लोहारा इन या हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे उपस्थित होते. बैठकीत उमेदवारीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर वयाची अट आणि काही राजकीय घडामोडींमुळे परिस्थिती बदलली. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपच्या संपर्कात गेल्याची चर्चा रंगली. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपही झाले. दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे शिवानी वडेट्टीवार यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांचे गणित तुलनेने जवळपास असले, तरी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढविण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
नागपूरचे किशोर कान्हेरे यांचे नावही चर्चेत होते. मात्र, तीनही जिल्ह्यांतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी उमेदवारीबाबत माघार घेतल्याचे समजते. अखेर काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांच्या नावावर एकमत साधले. विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर आणि सुभाष धोटे यांच्यातील मतभेदांच्या चर्चांदरम्यानही या निवडणुकीसाठी पक्षातील प्रमुख नेते एकत्र आल्याचे या बैठकीत दिसून आले. माजी मंत्री रणजित कांबळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला होता. वर्धा येथील उद्योजक म्हणून ओळख असलेल्या शैलेश अग्रवाल यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
