चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, “तुम्ही गांधी जिल्ह्यात येऊन मटण पार्टी करता, याचे पुरावे पक्षश्रेष्ठींना देणार,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवडणुकीदरम्यान प्रतिकूल राजकीय परिस्थिती, पक्षांतर्गत मतभेद आणि विरोधकांकडून आर्थिक ताकदीचा वापर होत असल्याने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी एका व्हिडिओ संदेशातून केला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांना उद्देशून, “निवडणुकीतील परिस्थितीसाठी इतर नेत्यांची कोणतीही जबाबदारी नाही का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचेही निलंबन करणार का, असा सवाल केला आहे.
अग्रवाल यांनी म्हटले की, चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात निवडणुकीची परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जात होती. विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शक्तीचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा होती. आपण उमेदवारी जाहीर केल्यानंतर या हालचालींना अधिक वेग आल्याचेही त्यांनी नमूद केले.
गटबाजी आणि नेत्यांमधील मतभेद
“निवडणूक शेवटपर्यंत लढविल्यास पक्षाचे तसेच वैयक्तिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. निवडणुकीचा अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे राजकीय आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला,” असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील गटबाजी आणि नेत्यांमधील मतभेद हेही निवडणुकीतील अडचणीचे प्रमुख कारण ठरल्याचा दावा त्यांनी केला. “अनेक ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे निवडणूक प्रभावीपणे लढविणे कठीण झाले,” असे ते म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर
नगरसेवकांना आर्थिक प्रलोभने देण्यात आल्याच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण केलेले वक्तव्य कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा नेत्यावर आरोप करण्याच्या उद्देशाने नव्हते. “खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर मी कोणताही थेट आरोप केलेला नाही. मात्र, निवडणूक प्रक्रियेत पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याची भावना होती,” असा दावा त्यांनी केला. आपल्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वालाही लक्ष्य केले. “जर संपूर्ण जबाबदारी माझीच मानली जात असेल, तर माझ्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, निवडणुकीतील परिस्थितीसाठी इतर नेत्यांची कोणतीही जबाबदारी नाही का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आरोप आणि टीका
यावेळी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले. आपल्या निलंबनाविरोधात वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घ्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, व्हिडिओ संदेशात अग्रवाल यांनी पक्ष नेतृत्वावर आणखी काही आरोप आणि टीका केली आहे. तथापि, त्यांच्या या दाव्यांवर संबंधित नेते किंवा काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
