नागपूर : विदर्भातील खनिज विदेशात नेता यावे म्हणून मध्य भारतातून समुद्रापर्यंत जाणारा नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधला जात असून तो उद्याोगपती अदानींसाठी अंथरलेला लाल गालिचा (रेड कार्पेट) ठरणार आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सपकाळ यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
राज्य शासनाच्या प्रस्तावित नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्गाबाबत सपकाळ म्हणाले, या महामार्गाची काहीच गरज नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाप्रसंगी ‘शक्तिपीठ’ महामार्गाचा पुनरुच्चार केला. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज समुद्रामार्गे विदेशात पाठवता यावे म्हणून मध्य भारतातून समुद्रापर्यंत अदानींसाठी ‘लाल गालिचा’ अंथरण्याकरिता हा महामार्ग बांधला जात आहे. यावर ८० हजार कोटी रुपये खर्च करणे गरजेचेच नाही. त्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, राज्यातील धार्मिक शक्तिपीठाच्या विकासासाठी निधी द्यावा, असे सपकाळ म्हणाले.
हेही वाचा
ते पुढे म्हणाले की, भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली अनेक आश्वासने पाळली नाहीत. ‘लाडक्या बहिणीं’ना २,१०० रुपये देणार होते. आता उलट त्यांची संख्याच कमी केली जात आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये देऊ, ही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती. तिचाही विसर त्यांना पडला आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असेही सपकाळ यांनी सांगितले.
‘सर्व निर्णय शहाच घेतात’
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी सर्व प्रमुख निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच घेतात. पक्ष फोडायचा असेल, मंत्रिमंडळाचे खातेवाटप असेल, एवढेच नव्हे तर कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल, हे सुद्धा शहाच ठरवतात, असा आरोप सपकाळ यांनी केला.
‘आम्ही महाराष्ट्र धर्मवादी’
आमच्यावर धर्मविरोधी असल्याचा आरोप भाजपकडून केला जात असला तरी आमचा धर्म हा फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्रधर्म आहे. संतांच्या गाथा बुडवणाऱ्या, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या, सावित्रीबाई यांच्या अंगावर शेण फेकणाऱ्या प्रवृत्तीचा धर्म आम्हाला मान्य नाही. भाजपला अभिप्रेत धर्म मान्य करायचे ठरवले तर अस्पृश्यता स्वीकारावी लागेल. ते कदापि शक्य नाही. भाजपने एकदा त्यांच्या धर्माची व्याख्या जाहीर करावी, ते धर्माधिकारी आहेत का? हे त्यांनी सांगावे, असे आव्हानही सपकाळ यांनी दिले.