अकोला : अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ या शकुंतला रेल्वेमार्गाचे नॅरोगेजवरून ‘ब्रॉडगेज’मध्ये परिवर्तन करण्याचे काम गत दशकांपासून रखडले आहे. सुमारे ११० वर्षांचा इतिहास असलेल्या शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीसाठी खासदार अनुप धोत्रे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले असून या मार्गाचा ‘डीपीआर’ तयार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यानंतरही रेल्वेवर ब्रिटिश कंपनीची मालकी
पश्चिम विदर्भात पिकणारा कापूस मुंबई मार्गे विदेशात नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी हा नॅरोगेज मार्ग निर्माण केला होता. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते अचलपूर या आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू होता. स्वातंत्र्यानंतरही या रेल्वेवर ब्रिटिश कंपनीची मालकी राहिली. मालकीहक्काशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे नॅरोगेज ते ब्रॉडगेज करण्याचा प्रकल्प रखडला होता.
११२ मध्ये निर्माण झाला मार्ग
मूर्तिजापूर ते यवतमाळ ११२ कि.मी. रेल्वे मार्ग १९१६ मध्ये तयार केला होता. सुमारे १०१ वर्ष सुरू असलेला हा नॅरोगेज मार्ग क्षतिग्रस्त झाल्याने व वाहतूक धोकादायक ठरत असल्याने २०१७ पासून बंद करण्यात आला. मूर्तिजापूर-अचलपूर हा ७७ कि.मी.चा रेल्वेमार्ग २०१९ पासून बंद केला आहे. या संपूर्ण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. आता तो पूर्ण झाला असून सादर करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
रेल्वेमार्ग जीर्ण झाल्याने बंद
हे रेल्वेमार्ग जीर्ण झाल्याने बंद करण्यात आले होते. आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यास विदर्भातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात असून त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास खा. अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
मार्गाचे काम सुरू होण्याचा विश्वास
११० वर्षे जुन्या अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ रेल्वेमार्ग बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे मंत्रालयाने ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यासाठी ‘डीपीआर’ तयार असल्याचे स्पष्ट केले. लवकरच या मार्गाचे काम सुरू केले जाईल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
राज्यात रेल्वेसाठी २३ हजार ९२६ कोटीची तरतूद
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटीची तरतूद केली आहे. २००९ ते २०२४ पर्यंत ही रक्कम केवळ एक हजार १७१ कोटी रुपये होती. गत १० वर्षात महाराष्ट्रात दोन हजार ५८५ कि.मी. नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
