नागपूर : शालार्थ प्रणालीमध्ये राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची नावे समाविष्ट करून कोट्यवधी रुपयाचे वेतन लाटल्याचा प्रकार घडला. नाशिक मधून चव्हाट्यावर आलेल्या या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे नंतर आढळले. त्यामुळे ‘शालार्थ ओळखपत्र’ घोटाळ्यात सरकारने विशेष तपास पथक नेमले. मात्र वारंवार मुदत वाढ देऊनही या तपासात गती येत नसल्याने राज्य सरकारने आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या देखरेखीखाली तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील सीआयडीचे विशेष पोलीस महानिरिक्षक सुधिर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात १२ ठिकाणी सुरू असलेल्या शालार्थच्या तपासाला दिशा दिली जात आहे.
शिक्षण विभागातील शालार्थ ओळखपत्र घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे आढळल्यानंतर सरकारने ७ ऑगस्ट २०२५ ला राज्य स्तरावर विशेष तपास पथक नेमले. तत्कालीन पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, शिक्षण सह संचालक हारून आतार यांनी प्रकरणाचा तपास हाती घेतला. मात्र काही दिवसांपूर्वी पुलकुंडवार यांची पुणे येथून मंत्रालयात ग्रामविकास विभाग सचिवपदी बदली झाली. त्यामुळे ‘एसआयटी’चे काम पुन्हा संथ झाले. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली चालवावे? याचा पेच निर्माण झाला होता. त्यावर विभागाने दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देत तंबीही दिली होती. मात्र तरीही तपासात फारसा वेग नसल्याने राज्य सरकारने आता सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक हिरेमठ यांच्या देखरेखीखाली राज्यातल्या शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.
तांत्रिक, डिजिटल न्याय वैद्यक पुराव्यांचा माग
संपूर्ण ऑनलाइन झालेल्या या प्रणालीमध्ये अनेक अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची नावे घुसवून आणि त्यांच्या नावे बनावट शालार्थ ओळखपत्रे तयार झाली. यातून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघकीस आले. त्यामुळे इंटरनेटवरून सादर झालेली कागदपत्रे कोणत्या वापरकर्त्याच्या खात्यातून पाठवली, त्यासाठी कोणत्या आयपी पत्त्याचा वापर झाला, याचे डिजिटल न्याय वैद्यक पुरावे सध्या गोळा केले जात आहेत. यात शालार्थ घोटाळा प्रकरणात १२ ठिकाणी सध्या तपास सुरू आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात दोन, पुणे जिल्ह्यात २, ग्रामीण भागात ६ तर जळगाव आणि नवी मुंबईत प्रत्येक एक अशा १२ ठिकाणी तपास सुरू आहे. त्या नुसार गुन्हे अन्वेषण विभागाकडून सध्या या तपास पथकांना दिशा निर्देश दिले जात आहेत.
आतापर्यंत ८ प्रकरणात आरोपपत्रे सादर
राज्यातील एकूण १२ पैकी आठ प्रकरणांमध्ये न्यायालयाला आरोपपत्र सादर झाली आहेत. यात नागपूर जिल्ह्यातल्या शालार्थ घोटाळ्याचा तपास केलेल्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने आतापर्यंत एक मुख्य आणि दोन पुरवणी अशी तीन आरोपपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. तर नाशिकच्या तपास पथकाने आतापर्यंत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील २२९ शाळांचे दप्तर ताब्यात घेत १७९ मुख्याध्यापकांची चौकशी केली. या घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ५५ जणांना अटक झाली आहे. यापैकी बहुतांश जण सध्या जामिनावर आहेत. तर आणखी ६१० शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.
राज्य स्तरावरील तपासात सुसुत्रता असावी, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील तपास पथकांच्या समन्वयासाठी सीआयडीने चार अधिकाऱ्यांवर नेमणूक केली आहे. हे अधिकारी राज्यातील १२ तपास पथकांकडून घोटाळ्यातील इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पावलांचे ठसे जमा करत आहेत. लवकरच त्याचे अवलोकन आणि अंकेक्षण करून सरकारला अहवाल सादर केला जाईल. – सुधिर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम), गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
प्रकरण काय?
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वेतनासाठी वापरल्या जाणार्या ऑनलाइन प्रणालीमध्ये अनेक अपात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची नावे घुसवून आणि त्यांच्या नावे बनावट शालार्थ आयडी तयार करून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघकीस आले. नाशिकमधून उघडकीस आलेल्या या घोटाळ्याची शृंखला नागपूर, जळगाव, नंदूरबार, बीड, लातूर, मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये पसरल्याचे उघडकीस आले होते. या घोटाळ्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. तीन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश होते. परंतु या अहवालाचाही अद्याप थांगपत्ता नाही.
