अकोला : ‘महाराष्ट्रात सर्व काम शरद पवार साहेबांमुळेच होतात. असे सर्वजण म्हणत असतात. ते खरेही आहे. त्यामुळेच कुठल्याही मुलीशी लग्न लावून देण्यासाठी त्यांना गळ घातली. ते लग्न लावून देतीलच,’ असा विश्वास शरद पवार यांना पत्र लिहिणारा लग्नाळू ३४ वर्षीय तरुण मंगेश इंगळे याने माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

राज्यात तरुणांच्या लग्नाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील ३४ वर्षीय तरुण मंगेश इंगळे याने थेट शरद पवार यांना गळ घातली. त्याने शरद पवारांना पत्र लिहून लग्न लावून देण्याची विनंती केली. आपले उपकार जन्मभर विसरणार नाही, असे देखील त्याने पत्रात नमूद केले. शरद पवारांनी तरुणाच्या लग्नासाठी मदत करण्याचे पदाधिकाऱ्यांना सूचित केल्याची माहिती आहे. या अनोख्या मागणीची राज्यात चांगलीच चर्चा होत आहे.

अकोल्यात शनिवारी शरद पवार शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकरी, नागरिक व तरुणांकडून पत्र व निवेदने देखील स्वीकारली. यामध्ये शरद पवार यांना प्राप्त झालेल्या पत्रात एका लग्नाळू तरुणाच्या अनोख्या मागणीने लक्ष वेधून घेतले आहे.

लग्नाळू तरुण मंगेश इंगळे याने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘मी ३४ वर्षांचा झालो. वय वाढत चालल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करुन मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरीही मी राहायला तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी मी देतो. मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी विसरणार नाही.’’

‘पवार साहेबांना म्हटले तर काम होते’

लग्नासाठी खूप प्रयत्न केले. अनेकांना म्हणले. मात्र, लग्न काही जुळले नाही. मनात एक विचार आला की शरद पवार साहेबांना म्हटले तर काम होते. महाराष्ट्रात सर्व जण म्हणतात, त्यांना सांगितले की काम होते. महाराष्ट्रातील सर्व कामे त्यांच्या मुळेच होतात. म्हणून त्यांना पत्र दिल्याचे तरुणाचे स्पष्ट केले. एकटे राहण्यापेक्षा त्यांना निवेदन दिले तर लग्न तरी होणार म्हणून हे पाऊल उचलल्याचे तरुणाने सांगितले.

राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडशी जुळलेला

लग्नाळू तरुण कला शाखेत पदवीधर आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून राष्ट्रवादी व संभाजी ब्रिगेडशी जुळलेला आहे. लग्न जमत नसल्याने आपण त्रस्त असल्याचे तो म्हणाला.