शरद पवार यांचे मत; ८ हजार कोटींपेक्षा अधिक जुन्या नोटांची पडताळणी रखडली

नोटबंदीला सहा महिने लोटले तरी राज्यातील ३४ पैकी ३२ जिल्हा बँकांमधील ८ हजार कोटींपेक्षा जास्त जुन्या नोटांची पडताळणी अद्याप झालेली नसल्याने या चलनाच्या संदर्भात सध्या काहीही निर्णय घेता येणार नाही, अशी भूमिका रिझव्‍‌र्ह बँकेने घेतल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना यंदा पीक कर्ज मिळणे कठीण झाले असून त्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्टय़ब्दीपूर्ती कार्यक्रमासाठी आलेल्या पवारांनी आज दुपारी काही निवडक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेने त्यांना पाठवलेले पत्रच वाचून दाखवले. ८ नोव्हेंबरच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील जिल्हा बँकांमध्ये ८ हजार कोटींपेक्षा जास्त जुने चलन जमा झाले आहे. या चलनाच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका पवारांनी अनेकदा घेतली आहे. मध्यंतरी त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्याला आता बँकेने उत्तर दिले असून त्यात हे चलन जमा झालेल्या खात्यांची पडताळणी झालेली नसल्याने त्या संदर्भात निर्णय घेता येत नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

जुन्या चलनाच्या संदर्भात इतर राष्ट्रीयीकृत बँकांची पडताळणी तत्परतेने करणारी रिझव्‍‌र्ह बँक जिल्हा बँकांच्या संदर्भात ही तत्परता का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी केला. ही पडताळणी केव्हा पूर्ण होईल यावर या पत्रात रिझव्‍‌र्ह बँकेने मौन बाळगले आहे याकडेही पवारांनी यावेळी लक्ष वेधले. हे पत्र मिळाल्यानंतर मी स्वत: अनेक जिल्हा बँकांकडे चौकशी केली तेव्हा नाबार्डकडून पडताळणी झालेली असल्याचे बहुतेक बँकांनी सांगितले. तरीही पडताळणी झालेलीच नाही असे रिझव्‍‌र्ह बँक कसे काय म्हणू शकते, असा सवाल त्यांनी केला. हे जुने चलन रिझव्‍‌र्ह बॅंकेने अद्याप स्वीकारले नसल्याने जिल्हा बँका कमालीच्या अडचणीत आल्या असून शेतकऱ्यांना खरिपाच्या हंगामासाठी कर्ज कसे द्यायचे असा त्यांच्यासमोर पडला आहे. अनेक बॅंकांनी कर्जाच्या संदर्भात नकारात्मक भूमिका घेतल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, असे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी इतरही चर्चा केली. देशातील विरोधक कमी पडत असल्याचेही ते म्हणाले.

  • राज्यातील ३४ पैकी केवळ २ बँकांची पडताळणी नाबार्डकडून करण्यात आली आणखी ३२ बँकांची पडताळणी व्हायची आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे म्हणणे आहे. ही कूर्मगती शेतकऱ्यांच्या मूळावरच घाव घालणारी आहे, अशी टीका पवार यांनी केली.